बर्न : अंतराळात लाल रंगाने चमकणारा मंगळ ग्रह नेहमीच असा ‘लाल’ नव्हता. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका खळबळजनक खुलाशानुसार, सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ हा पृथ्वीसारखाच एक ‘निळा ग्रह’ होता. नवीन संशोधनात मंगळावर पृथ्वीवरील आर्क्टिक महासागराच्या आकाराचा एक विशाल समुद्र आणि नद्यांचे जाळे अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत.
मंगळावर पाणी असल्याचे संकेत यापूर्वीही मिळाले होते; परंतु ते किती अवाढव्य होते हे आता स्पष्ट झाले आहे. संशोधकांच्या मते, प्राचीन काळी मंगळाचा अर्धा भाग महासागराने व्यापलेला होता. हा समुद्र आपल्या उत्तर ध—ुवावरील आर्क्टिक महासागराएवढा विशाल असावा, असा अंदाज आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बर्न येथील संशोधक इग्नेशियस अर्गाडेस्ट्या यांनी सांगितले की : ‘आपण आज मंगळाला कोरडा आणि लाल ग्रह म्हणून ओळखतो. मात्र, आमचे परिणाम दर्शवतात की तो पूर्वी पृथ्वीसारखाच निळा ग्रह होता.
हाय-डेफिनिशन उपग्रह फोटोंच्या मदतीने आम्ही तेथील भूभागाचे बारकाईने नकाशे तयार केले आहेत.’ मंगळाभोवती फिरणार्या ऑर्बिटरने घेतलेल्या उच्च दर्जाच्या छायाचित्रांचे विश्लेषण केल्यावर शास्त्रज्ञांना काही धक्कादायक साम्य आढळले : नद्यांचे त्रिभुज प्रदेश (डेल्टा) : मंगळावरील काही संरचना पृथ्वीवरील नद्यांच्या मुखाशी तयार होणार्या ‘डेल्टा’ सारख्याच आहेत. सागरी किनारपट्टी : संशोधकांना अशा खुणा सापडल्या आहेत ज्या दर्शवतात की, एकेकाळी तिथे नद्यांचे पाणी महासागराला जाऊन मिळत होते. कॅन्यन सिस्टम: विशाल दर्या आणि पर्वत हे पृथ्वीवरील डोंगराळ भागांशी साधर्म्य दर्शवतात.
आज मंगळावरील या नद्यांच्या आणि समुद्राच्या जागी वाळूचे ढिगारे पसरलेले असले, तरी त्यांचा मूळ आकार आजही स्पष्टपणे ओळखता येतो. पाणी हे जीवसृष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक मानले जाते. मंगळावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी अस्तित्वात होते, याचा अर्थ तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे. या शोधामुळे अंतराळ संशोधकांना मंगळावर सजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी आता अधिक बळ मिळणार आहे. हे संशोधन ‘npj Space Exploration’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.