लंडन : ‘नासा’च्या ‘पर्सेव्हरन्स’ रोव्हरने मंगळ ग्रहावरील अब्जावधी वर्षांपूर्वी सुकलेल्या नदीच्या पात्रातील खडकांमध्ये जटिल कार्बन रेणू शोधून काढले आहेत. हे रेणू प्राचीन सूक्ष्मजीवसृष्टीचे संकेत असू शकतात, त्यामुळे वैज्ञानिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
‘ब्राईट एंजेल’ खडकांमध्ये लागला शोध
मंगळावरील ‘जेझेरो क्रेटर’ या विवरात अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी वाहून आणणाऱ्या ‘नेरेत्वा व्हॅलिस’ नावाच्या सुकलेल्या नदीच्या पात्रात हा रोव्हर संशोधन करत आहे. रोव्हरवरील ‘शेरलॉक' या प्रगत अल्ट्राव्हायोलेट लेझर उपकरणाच्या साहाय्याने ‘ब्राईट एंजेल’ नावाच्या खडकांचे निरीक्षण करण्यात आले. या खडकांवर लेझर प्रकाश टाकून परावर्तित झालेल्या प्रकाशाचा अभ्यास केला असता, तिथे मॅक्रोमॉलिक्युलर कार्बन म्हणजेच सेंद्रिय कार्बनचे जटिल रेणू असल्याचे आढळले. या खडकांवर २०२४ मध्येही काही विशिष्ट डाग आणि गाठी आढळल्या होत्या, ज्या पृथ्वीवरील सूक्ष्मजीवांच्या जीवाश्मांसारख्या दिसतात. नासाच्या माजी प्रमुखांच्या मते, ‘‘मंगळावर जीवसृष्टी असल्याचा हा आतापर्यंतचा सर्वात स्पष्ट संकेत असू शकतो.’’
जीवसृष्टीचा ठोस पुरावा की भौगोलिक प्रक्रिया?
प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटच्या डॉ. अॅशले मर्फा यांनी स्पष्ट केले की, जरी मॅक्रोमॉलिक्युलर कार्बन हा पृथ्वीवर कोळसा आणि सूक्ष्मजीवांच्या अवशेषांमध्ये आढळत असला, तरी मंगळावर केवळ याच्या अस्तित्वामुळे जीवसृष्टीचा अंतिम पुरावा मिळत नाही. हा कार्बन खडक आणि पाण्याच्या रासायनिक प्रक्रियेतून किंवा उल्कापातांमुळेही तयार झालेला असू शकतो.
जेट प्रोपल्शन लॅबचे वैज्ञानिक डॉ. काइल उकर्ट, वैज्ञानिक यांनी सांगितले, ‘‘पर्सेव्हरन्स रोव्हरवरील उपकरणे हा कार्बन सजीव प्रक्रियेतून तयार झाला की निर्जीव, हे सांगण्यास सक्षम नाहीत. याचा अचूक शोध घेण्यासाठी हे खडक पृथ्वीवरील प्रयोगशाळेत आणून तपासणे आवश्यक आहे.’’
दोन हजार मैलांचे अंतर आणि भविष्यातील मोहीम
विशेष म्हणजे, नासाच्या दुसऱ्या ‘क्युरिऑसिटी’ रोव्हरलाही २,००० मैल दूर असलेल्या ‘गेल क्रेटर’मध्ये अशाच प्रकारचे सेंद्रिय रेणू सापडले होते. यावरून अब्जावधी वर्षांपूर्वी संपूर्ण मंगळ ग्रहावर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण आणि सेंद्रिय घटकांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होती, या दाव्याला बळकटी मिळते. नासा आता २०३० च्या दशकात मंगळावरील खडकांचे हे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी ‘सॅम्पल रिटर्न मिशन’चे नियोजन करत आहे, तर चीन २०३१ पर्यंत स्वतःचे नमुने पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे. त्यानंतरच मंगळावरील जीवसृष्टीचे गूढ पूर्णपणे उकलणार आहे.