मेटाचे (फेसबुकची पॅरेंट कंपनी) सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) बाबत पाच मोठ्या आणि धाडसी भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्या मते, आपण आता अशा युगात पोहोचलो आहोत, जिथे ‘सुपरइंटेलिजन्स’ (अत्यंत बुद्धिमान एआय) ही आता केवळ कल्पनेतील गोष्ट राहिलेली नाही. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन पूर्णपणे बदलून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. झुकेरबर्ग यांनी मांडलेली ही पाच भाकिते केवळ तंत्रज्ञानाबद्दल नसून, ती माणसाच्या भविष्यातील जीवनशैलीवर प्रकाश टाकणारी आहेत. ही भाकिते अशी :
झुकेरबर्ग यांच्या मते, माणसाने तयार केलेली सुपरइंटेलिजन्स आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे. जरी हे तंत्रज्ञान सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असले, तरी त्याची दिशा आणि विकासाचा वेग पाहता, लवकरच ते मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकेल, हे निश्चित आहे.
जिथे अनेक मोठ्या टेक कंपन्या ‘एआय’चा वापर करून सर्व कामे स्वयंचलित करण्यावर भर देत आहेत, तिथे मेटाचा द़ृष्टिकोन वेगळा आहे. झुकेरबर्ग सांगतात की, मेटाचा उद्देश असा ‘पर्सनल एआय’ तयार करणे आहे, जो प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर मदत करेल, त्याची खासगी ध्येये गाठण्यास सहाय्य करेल आणि त्याचे जीवन अधिक चांगले बनवेल.
झुकेरबर्ग यांचा विश्वास आहे की, भविष्यातील एआय केवळ ऑफिसची कामे किंवा उत्पादकता वाढवण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो आपल्या सर्जनशीलतेत, नातेसंबंधांमध्ये, शिकण्याच्या प्रक्रियेत आणि आत्म-विकासातही आपला साथीदार असेल. थोडक्यात, ‘एआय’ आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य सोबती बनेल.
भविष्यात एआय तुमच्यासोबत प्रत्येक क्षणी असेल आणि तो स्मार्ट ग्लासेसमध्ये एकत्रित (Integrated) असेल. हे स्मार्ट ग्लासेस तुम्ही जे पाहता आणि ऐकता, ते समजून घेण्यास सक्षम असतील. याचा अर्थ असा की, स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या तुलनेत हे डिव्हाईस सभोवतालच्या परिस्थितीचे अधिक चांगले भान ठेवून (Context-aware) तुम्हाला मदत करतील.
सुपरइंटेलिजन्सचे धोकेही आहेत, हे झुकेरबर्ग यांनी मान्य केले. मात्र, मेटा या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारीने करू इच्छिते. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले (Open Access) असावे आणि त्याचा फायदा संपूर्ण जगाला मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा (Infrastructure) निर्माण करण्यास मेटा सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. थोडक्यात, मार्क झुकेरबर्ग यांनी केवळ मेटाच्या उत्पादनांबद्दल सांगितले नाही, तर तंत्रज्ञान आणि मानवाच्या भविष्यातील नात्याचे एक मोठे चित्र जगासमोर ठेवले आहे. ही भाकिते भविष्यात कितपत खरी ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासाचा पुढील टप्पा मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता ठेवतो.