कैरो : इजिप्तमधील नाईल नदीच्या पश्चिमेकडील भागात पुरातत्त्व शास्त्रज्ञांना प्राचीन इतिहास उलगडणारा एक अद्भुत खजिना सापडला आहे. येथील ‘एहनासिय्या एल मदिना’ या प्राचीन शहरात झालेल्या उत्खननात प्राचीन ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन संस्कृतीचा मिलाफ असलेले अवशेष हाती आले आहेत. यामध्ये ग्रीक देवतेचा संगमरवरी चेहरा, रोमन काळातील बॅसिलिका आणि इजिप्तच्या राजाचे राजचिन्ह समाविष्ट आहे.
इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एहनासिय्या हे शहर इसवी सन पूर्व २११८ ते १९८० दरम्यान प्राचीन इजिप्तची राजधानी होते. रोमन काळात हे शहर ‘हेराक्लिओपोलिस मॅग्ना’ म्हणून ओळखले जात असे.
संशोधनात काय काय सापडले?
उत्खननादरम्यान ४,००० वर्षांपूर्वीचा एक दगडी शिलालेख सापडला आहे. यावर इजिप्तच्या १२ व्या राजवंशातील राजा (फेअरो) सेनूस्रेट तिसरा याचे 'कार्टूश' म्हणजेच राजचिन्ह कोरलेले आहे. याशिवाय या दगडावर राजाच्या राज्याभिषेकाची तारीख आणि स्थानिक देवतेचे नावही लिहिलेले आहे. ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाचा पुरावा म्हणून येथे ग्रीक सौंदर्य आणि प्रेमाची देवता 'अॅफ्रोडाईट' हिचा १० इंच उंच संगमरवरी चेहरा सापडला आहे, ज्याची रचना अत्यंत सुबक आहे. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर इजिप्तमध्ये ग्रीक संस्कृतीचा प्रभाव वाढला होता.
रोमन बॅसिलिका आणि नाणी बनवण्याचे साचे
रोमन साम्राज्याच्या काळातील एक ‘बॅसिलिका’ (सार्वजनिक आणि न्यायालयीन कामासाठी वापरली जाणारी मोठी वास्तू) देखील येथे सापडली आहे. यासोबतच रोमन काळातील भिंतीवरील पुतळे आणि त्या काळी संपूर्ण रोमन साम्राज्यात चालणारी नाणी तयार करण्यासाठी वापरले जाणारे मातीचे साचे (सिरॅमिक मोल्डस्) पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, एकाच शहरात वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळ्या संस्कृतींचे हे अवशेष मिळणे अत्यंत दुर्मीळ आहे. राजा रामसेस तिसऱ्याच्या मृत्यूनंतर इजिप्तचे साम्राज्य कमकुवत झाले आणि तिथे एकामागून एक परदेशी राज्यकर्त्यांनी (ग्रीक, रोमन आणि इस्लामिक) राज्य केले. हे नवीन शोध एहनासिय्या शहराचे ऐतिहासिक महत्त्व आणि तिथला बहुसांस्कृतिक इतिहास जगासमोर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.