वॉशिंग्टन : अनेक लोक त्यांच्या ऑफिस तसेच घरात तासनतास बसून (Sit) राहतात त्यांना 'स्पॉन्डिलायटिस'च्या समस्येला सामोरे जावे लागते. 'स्पॉन्डिलायटिस' ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये मानेपासून पाठीपर्यंत वेदना आणि कडकपणा कायम राहतो. हा त्रास सहसा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे होतो. त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून (Sit) राहू नये. मध्ये मध्ये उठावे आणि थोडावेळ चालले पाहिजे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो, असे अमेरिकेतील एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
अनेक लोक कार्यालयांमध्ये कामाच्या ताणामुळे अनेक तास एकाच जागेवर आणि एकाच स्थितीत बसून काम करतात. त्यांना या गोष्टीचा अजिबात अंदाज नसतो की, ते त्यांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत. अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या संशोधनानुसार, दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. या संशोधनानुसार सतत खुर्चीवर बसून राहिल्याने वेगवेगळ्या आजारांनी मृत्यूचा धोका 27 टक्के आणि टेलिव्हिजन बघत राहिल्याने होणार्या आजारांनी मृत्यूचा होण्याचा धोका 19 टक्के वाढतो. एकाच स्थिती जास्त वेळ बसून राहिल्याने पाठीचा मणक्याच्या हाडांवर जास्त दाब येतो. तसेच सरळ न बसता वाडके होऊन बसल्याने मणक्याची हाडे आणि जॉइंट्स खराब होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात पाठ आणि मान दुखणे या समस्यांना सामोरे जावे लागते.
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने स्नायूंमधील चरबी कमी खर्च होते. ज्यामुळे फॅटी अॅसिड हृदयाच्या कार्यप्रणालीमध्ये अडचण निर्माण करते. एकाच स्थितीत जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक वाढते आणि सोबतच अनेक प्रकारचे कर्करोग आणि इतरही गंभीर आजार होऊ शकतात. जास्त वेळ बसून राहिल्याने आपले स्नायू क्रियाशील राहत नाहीत. ज्यामुळे आपल्या मेंदूला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळू शकत नाही. तज्ज्ञांनी म्हटले आहे की काम करताना ऑफिस किंवा घरात खुर्चीवर बसताना सरळ बसा आणि पाय जमिनीवर ठेवा.
अनेकदा खुर्चीवर बसताना लोक खुर्चीची उंची वाढवतात आणि पाय हवेत लटकत असतात. ही बसण्याची योग्य पद्धत नाही. कारण हवेत पाय लटकल्याने कंबरेच्या हाडावर दबाव पडतो, ज्याने गुडघ्यात आणि पायांमध्ये वेदना होतात. त्यामुळे कंबर आणि पायांसोबतच पाठीचा कण्याला इजा पोहोचते. घरी किंवा कार्यालयात खुर्चीवर बसताना पायांना जमिनीवर ठेवा. कधीही पुढच्या बाजूने वाकून बसू नका. तुमचं पूर्ण वजन हे खुर्चीच्या मागच्या बाजूला ठेवा. कॉम्प्युटर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. काम करताना पाय एकावर एक ठेवून बसणेही योग्य नाही. यामुळे नसा दबण्याची शक्यता आहे.