न्यूयॉर्क : हजारो वर्षांपासून मानव काचेची निर्मिती करीत आला आहे. मात्र आता पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीतील प्रा. जॉन मौरो यांनी अशी काच बनवली आहे जी 'इको-फ्रेंडली' म्हणजेच पर्यावरणाला पूरकही आहे आणि अत्यंत मजबूतही आहे. ही काच सहजपणे फुटली जात नाही. या काचेपासून बनवलेली एखादी बाटली जमिनीवर पडली तरी फुटणार नाही असा त्यांचा दावा आहे. या काचेचेचे नाव आहे 'लायन ग्लास'. ती स्टँडर्ड ग्लासच्या तुलनेत दहापटीने अधिक मजबूत आहे.
या संशोधनाचा रिपोर्ट अद्याप कोणत्याही विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झालेला नसल्याने 'लायन ग्लास'बाबतची तपशीलवार माहिती उपलब्ध नाही. मात्र, प्रा. मौरो आणि त्यांच्या टीमने नुकतेच या काचेसाठी पेटंट अर्ज दाखल केला आहे. या काचेबाबतची समजलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिच्या निर्मितीसाठी स्टँडर्ड ग्लासप्रमाणे सोडा अॅश किंवा लाईमस्टोनची (चुनखडी) गरज भासत नाही. त्याऐवजी जी सामग्री वापरली जाते तिची माहिती कटाक्षाने गुप्त ठेवण्यात आली आहे.
काचेची एखाद्या रत्नासारखी असलेली चमक तसेच कोणत्याही आकारात तिच्या वस्तू बनवल्या जात असल्याने हजारो वर्षांपासून मानवाकडून काचेचा वापर सुरू आहे. मात्र, काच चटकन फूटून तिचे तुकडे होत असल्याचा दोष यामध्ये आहे. शिवाय सोडा अॅश आणि लाईमस्टोन एकत्रितपणे क्वॉर्ट्झ सँडबरोबर तापवल्यास त्यामधून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. हा एक 'ग्रीनहाऊस गॅस' असून त्याच्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असते. तसेच या क्रियेत मोठ्या ऊर्जेचीही आवश्यकता असते. आता या उणीवा नव्या काचेच्या निर्मितीत दर करण्यात आल्या आहेत.