इम्फाळ (मणिपूर) : भारतातील मणिपूर राज्यातून उडालेल्या तीन चिमुकल्या अमूर फाल्कन पक्ष्यांनी आपल्या अचाट जिद्दीने संपूर्ण जगाला थक्क केले आहे. ‘अपापांग’, ‘अलांग’ आणि ‘आहू’ नावाच्या या पक्ष्यांनी अवघ्या काही दिवसांत हजारो किलोमीटरचा प्रवास करून आफ्रिका खंड गाठण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. डिसेंबर महिन्यात झालेला हा प्रवास जगातील सर्वात लांब आणि सलग उड्डाणांपैकी एक मानला जात आहे.
या मोहिमेत ‘अपापांग’ नावाच्या मादी अमूर फाल्कनने सर्वाधिक लांब उड्डाण केले. नोव्हेंबरमध्ये तिला सॅटेलाईट टॅग लावण्यात आला होता. त्यानंतर तिने कोठेही न थांबता सलग 6,100 किलोमीटर अंतर पार केले. भारतातून उड्डाण केल्यावर तिने अथांग अरबी समुद्र पार केला आणि ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’वरून उडत थेट केनिया गाठले. अवघ्या सहा दिवसांत पूर्ण झालेली ही झेप लहान शिकारी पक्ष्यांच्या श्रेणीतील एक ऐतिहासिक उपलब्धी आहे. अलांग : या सर्वात तरुण फाल्कनला ‘पिवळा टॅग’ लावण्यात आला होता. त्याने 5,600 किलोमीटर प्रवास करून केनिया गाठले. विशेष म्हणजे, या प्रवासात त्याने तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यात काही काळ मुक्काम करून आपली ऊर्जा पुन्हा मिळवली होती.
आहू : ‘लाल टॅग’ असलेल्या या पक्षाने प्रथम बांगला देशमध्ये विश्रांती घेतली आणि त्यानंतर अरबी समुद्र पार करून सुमारे 5,100 किलोमीटर अंतर कापत सोमालिया गाठले. प्रत्येकाचा मार्ग जरी वेगळा असला, तरी त्यांची जिद्द आणि आफ्रिका गाठण्याचे ध्येय मात्र एकच होते. अमूर फाल्कन हे त्यांच्या लहान आकारासाठी; पण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखले जातात. या पक्षांचा प्रवास हे सिद्ध करतो की, जगातील विविध देश, समुद्र आणि महाद्वीप यांचे पर्यावरण एकमेकांशी जोडलेले आहे.
जर त्यांच्या स्थलांतराच्या मार्गात कोठेही अडथळा आला, तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होऊ शकतो. वैज्ञानिक या पक्ष्यांच्या स्थलांतराच्या आकडेवारीचा अभ्यास करत असून त्याद्वारे भविष्यातील संवर्धन योजना तयार केल्या जात आहेत. दरवर्षी होणारा हा प्रवास पक्षीप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या चिमुकल्या पाहुण्यांच्या मार्गातील सुरक्षितता आणि त्यांच्या थांबण्याच्या जागांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.