हाँगकाँग : जगातील खारफुटीची जंगले (मँग्रोव्ज) मानवासाठी एक अत्यंत महत्त्वाची पण दुर्लक्षित सेवा बजावत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ही जंगले पाण्यातील घातक नायट्रोजन प्रदूषण स्वच्छ करण्याचे काम करतात. जर मानवाला हेच काम कृत्रिमरीत्या करावे लागले असते, तर त्यासाठी दरवर्षी तब्बल 8.7 अब्ज डॉलर्स (सुमारे 73,000 कोटी रुपये) खर्च करावे लागले असते.
खारफुटी ही उष्णकटिबंधीय किनारपट्टी भागात आढळणारी वनस्पती आहे. संशोधकांच्या मते खारफुटीची गुंतागुंतीची मुळे गाळ साठवून ठेवतात, ज्यामध्ये विशिष्ट सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव पाण्यातील घातक नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजन वायू आणि नायट्रस ऑक्साईडमध्ये करतात. या प्रक्रियेमुळे पर्यावरणातील अतिरिक्त पोषक घटक बाहेर काढले जातात आणि परिसंस्थेचे संतुलन राखले जाते. नायट्रोजन प्रदूषणाचा धोका शेती आणि मानवी हस्तक्षेपामुळे जलस्रोतांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढत आहे.
2002 ते 2010 दरम्यान, गोड्या पाण्याच्या परिसंस्थेत दरवर्षी 32.6 दशलक्ष मेट्रिक टन नायट्रोजन वाहून गेला. या प्रदूषणामुळे पाण्यात शेवाळाची प्रचंड वाढ होते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी घटते आणि जलचर प्राण्यांसह मानवाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष ‘अर्थ्स फ्युचर’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात चिनी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे प्राध्यापक बेनोइट थिबोडो आणि झियान वांग यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
खारफुटीची जंगले पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या 0.1 टक्क्यापेक्षाही कमी आहेत, तरीही ती दरवर्षी सुमारे 8,70,000 मेट्रिक टन नायट्रोजन काढून टाकतात. जर परिस्थिती अनुकूल असेल, तर ही क्षमता 50 लाख मेट्रिक टन प्रति वर्षापर्यंत वाढू शकते. यापूर्वी खारफुटीला केवळ कार्बन साठवण्यासाठी आणि वादळांपासून संरक्षणासाठी ओळखले जात असे; मात्र आता त्यांचे ‘नायट्रोजन फिल्टर’ म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे.‘आम्ही घातक नायट्रोजन वातावरणात अशा स्वरूपात सोडतो जो निष्क्रिय असतो आणि हजारो वर्षे तिथेच राहू शकतो. खारफुटीची ही क्षमता समजून घेण्याच्या आम्ही अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहोत,’ असे संशोधकांनी सांगितले.