हनोईः या जगात निसर्गाच्या नियमांनाही अपवाद ठरणारे काही लोक आहेत. गिरीबाला किंवा प्रल्हाद जानी यांच्यासारखे काही लोक 50-60 वर्षे काहीही न खातापिता जिवंत राहिले, इतकेच नव्हे तर दैनंदिन आयुष्यात चांगले सक्रियही होते. काही लोक केवळ चहा घेऊन किंवा तत्सम माफक अन्न-पाणी घेऊनही अनेक वर्षे राहिलेले आढळून येतात. केवळ आहाराबाबतच असे अपवाद आहेत असे नाही. व्हिएतनाममध्ये एक शेतकरी असा आहे, जो गेली 62 वर्षे झोपलेलाच नाही!
सर्वांसाठी झोप ही किती महत्त्वाची असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. एक दिवसही झोप पूर्ण झाली नाही तर लगेच शरीराच्या तक्रारी, त्रास सुरू होतात, काम करणे सुचत नाही. अन्न-पाण्यासारखंच झोपही तेवढीच महत्त्वाची आहे, पण हा माणूस तब्बल 62 वर्षे झोपलेला नाही. त्याची ही अडचण पाहून डॉक्टरही थक्क झाले होते. शास्त्रज्ञांच्या मते, माणसांसाठी श्वास घेण्याइतकीच झोपही महत्त्वाची असते. पण या माणसाच्या बाबतीत सगळंच उलट घडलं आहे.
हा एक शेतकरी असून, त्याचे नाव थाई न्गोक आहे आणि तो आता 81 वर्षांचा आहे. त्याच्या न झोपण्यामागचे कारणही फार विचित्र आहे. हे कारण म्हणजे न्गोक यांना आलेला ताप. त्यांनी दावा केला आहे की, 1962 मध्ये त्यांना तीव्र ताप आला होता. तेव्हापासून ते झोपलेले नाहीत. ते डुलकीही घेत नाहीत किंवा गाढ झोप घेत नाहीत. न्गोक गेल्या 60 ते 62 वर्षांपासून केवळ जागेच नाहीत तर त्यांच्या शेतातही काम करत आहे. त्यांना कधीही कोणीही झोपलेलं कधीच पाहिलेलं नाही. याबाबत त्यांची पत्नी, मुले, मित्र तसेच त्यांच्या शेजार्यांनी पुष्टी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या दुर्मीळ आजारामुळे डॉक्टर गोंधळलेले आहेत.
वृत्तानुसार, व्हिएतनाममधील क्वांग नाम प्रांतातील एका छोट्या गावात 1942 मध्ये जन्मलेला न्गोक व्हिएतनाम युद्धादरम्यान वयाच्या 20 व्या वर्षी ते तीव्र तापाने आजारी पडले होते. काही दिवसांनी त्याचा ताप कमी झाला, पण त्याला पुन्हा झोप मात्र लागली नाही. न्गोकने म्हटलं की, त्यांनी झोप येण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला झोप आली नाही. त्याने म्हटलं की, ‘झोपण्यासाठी मी औषध घेतलं, घरगुती उपचार करून पाहिले, झोपण्यासाठी चक्क दारूही प्यायलो, पण काहीही उपयोग झाला नाही.’ अखेर हा व्यक्ती आजपर्यंत झोपलेलाच नाही. ते रात्रीच्या वेळी बसून असतात किंवा घरगुती कामे करतात. रात्रीच्या वेळी ते कधी कधी शेतातही काम करीत असतात!