Friend's loan | ३० वर्षांनंतरही मित्राचे कर्ज विसरला नाही; १००० रुपयांच्या बदल्यात परत केले २५ हजार 
विश्वसंचार

Friend's loan | ३० वर्षांनंतरही मित्राचे कर्ज विसरला नाही; १००० रुपयांच्या बदल्यात परत केले २५ हजार

गुगल मॅपच्या मदतीने शोधले घर

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : आजच्या काळात जिथे लोक पैशांसाठी नाती विसरतात, तिथे एका व्यक्तीने प्रामाणिकपणा आणि मैत्रीचे अनोखे उदाहरण सादर केले आहे. केरळच्या एका व्यक्तीने आपल्या मित्राकडून ३० वर्षांपूर्वी घेतलेले १००० रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी तब्बल १००० किलोमीटरचा प्रवास केला आणि गुगल मॅपच्या मदतीने त्याचे घर शोधून काढले.

१९९० च्या दशकात केरळचे मोहम्मद इस्माईल आणि तेलंगणाचे एडला लचन्ना सौदी अरेबियात एकत्र काम करत होते. त्यादरम्यान इस्माईल यांनी लचन्ना यांच्याकडून १२० सौदी रियाल (त्याकाळी सुमारे १००० रुपये) उधार घेतले होते. भारतात परतल्यानंतर संपर्क साधण्याची कोणतीही साधने नसल्याने दोघांचा संपर्क तुटला. मात्र, इस्माईल हे कर्ज विसरले नव्हते. त्यांनी गुगल मॅप आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील धरमापुरी गाव गाठले आणि आजच्या विनिमय दरानुसार (एक्‍सचेज रेट) लचन्ना यांना २५,००० रुपये परत केले.

पैशांमुळे तुटते ३६% मैत्री

एकीकडे ही भावुक करणारी कथा समोर आली असताना, 'लेंडिंगट्री' च्या एका सर्वेक्षणातून जगातील एक कडू सत्य समोर आले आहे. या सर्वेक्षणात खालील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादामुळे जगभरातील ३६ टक्‍के लोकांची मैत्री कायमची तुटली आहे. ७७ टक्‍के लोकांनी कधी ना कधी मित्रांना पैसे उधार दिले आहेत; परंतु त्यापैकी ३२ टक्‍के लोकांना त्यांचे पैसे कधीच परत मिळाले नाहीत. महागड्या प्लॅन्सच्या खर्चामुळे ६९ टक्‍के लोकांनी मित्रांसोबत जाणे टाळले आहे, तर ३९ टक्‍के लोक पैशांची चणचण लपवण्यासाठी मित्रांशी खोटे बोलतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT