पॅरिस : वैद्यकीय क्षेत्रात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या विज्ञानाच्या नियमांनाही आव्हान देतात. अशीच एक थक्क करणारी घटना फ्रान्समधून समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या एका अशा व्यक्तीची गोष्ट व्हायरल होत आहे, जी व्यक्ती चक्क 90 टक्के मेंदूविना आपले दैनंदिन आयुष्य अतिशय आरामात जगत होती. त्याच्या कवटीत केवळ 10 टक्के मेंदू शिल्लक असल्याचे स्कॅन रिपोर्टमध्ये समोर आल्यावर डॉक्टरांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
संबंधित व्यक्ती आपले सामान्य आयुष्य जगत होती, त्याला नोकरी होती आणि स्वतःचे कुटुंबही होते. एकदा पाय दुखू लागल्याने तो डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान जेव्हा त्याच्या डोक्याचे स्कॅनिंग (बे्रन स्कॅन) करण्यात आले, तेव्हा सत्य समोर आले. त्याच्या कवटीचा 90 टक्के भाग हा मेंदूऐवजी एका द्रव पदार्थाने भरलेला होता. या द्रवाच्या दाबामुळे त्याचा मेंदू इतका संकुचित झाला होता की, केवळ एक पातळ पापुद्रा शिल्लक राहिला होता.
एवढी गंभीर स्थिती असतानाही ही व्यक्ती सामान्यपणे कशी वागत होती, हे डॉक्टरांसाठी एक मोठे कोडे होते. याचे उत्तर विज्ञानातील न्यूरोप्लास्टिसिटी या संकल्पनेत दडलेले आहे. डॉक्टरांच्या मते, ही स्थिती अचानक उद्भवली नव्हती, तर गेल्या अनेक वर्षांपासून हळूहळू विकसित झाली होती. मेंदूचा आकार कमी होत असताना, शिल्लक राहिलेल्या 10 टक्के भागावरच शरीराने सर्व कार्यांची जबाबदारी सोपवली. मानवी मेंदू हा परिस्थितीनुसार स्वतःची कार्यप्रणाली बदलू शकतो, याचे हे एक जिवंत उदाहरण ठरले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मानवी मेंदू हा जगातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव आहे. साधारणपणे मेंदूच्या छोट्या भागाला इजा झाली, तरी माणसाचे आयुष्य विस्कळीत होते. मात्र, या केसमध्ये मेंदूच्या एका लहान भागाने संपूर्ण शरीराचे नियंत्रण कसे सांभाळले, हा संशोधनाचा विषय बनला आहे.