वॉशिंग्टन ः एलियन्स म्हणजेच परग्रहवासी खरोखरच अस्तित्वात आहेत की नाही, हे अद्याप विज्ञानाने ठामपणे सांगितलेले नाही. मात्र, अंतराळाच्या या अफाट पसार्यात केवळ पृथ्वी नामक छोट्याशा ग्रहावरच जीवसृष्टी असेल, हे कुणालाही पटण्यासारखे नाही. उडत्या तबकड्या म्हणजेच युफो आणि त्यामधून पृथ्वीवर ये-जा करीत असलेल्या एलियन्सबाबत सातत्याने दावे केले जात असतात. अमेरिकेत एक असा माणूस होता, ज्याने एलियन्स पाहिल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे, तर एड्ससारखा भयावह आजार एलियन्सनेच पृथ्वीवर पसरवला, असा दावाही या माणसाने केला होता!
एलियनशी संबंधित घटना, बातम्या आणि रहस्य हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. अशीच एक खळबळजनक कहाणी काही काळापूर्वी अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातून समोर आली होती. कैल्विन पार्कर नावाच्या एका व्यक्तीने असा दावा केला होता की, एलियन थेट माणसांना मारत नाहीत, तर त्यांनी अशी एक आजार पसरवला आहे, ज्याच्यामुळे माणूसच माणसाचा शत्रू झाला आहे. ही घटना 11 ऑक्टोबर 1973 ची आहे. पार्कर, चार्ल्स हिक्सन आणि मारिया ब्लेयर हे तिघं पास्कागूला नदीच्या काठावर असताना त्यांनी एका उडत्या तबकडीचं (युफो) दर्शन झाल्याचा दावा केला. पार्कर आणि हिक्सनने सांगितलं की, त्यांना एलियनने अपहरण करून एका विचित्र अंतराळयानात नेलं आणि त्यांच्यावर तिथं काही प्रयोग केले गेले. चार्ल्स हिक्सन या घटनेविषयी अनेक वर्षे मोकळेपणाने बोलले; मात्र कैल्विन पार्कर खूप काळ गप्प राहिला, भीतीपोटी. पुढे युफो संशोधक आणि लेखक फिलिप मॅन्टल यांनी पार्करशी संपर्क साधला आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित काही पुस्तके लिहिली. कैल्विन पार्करचा 2023 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मॅन्टलला पार्करचा एक जुना मुलाखत व्हिडीओ सापडला, ज्यामध्ये त्यांनी 1992 मध्ये एलियनशी पुन्हा एकदा संपर्क झाल्याचा दावा केला होता. यावेळी, पार्करच्या म्हणण्यानुसार, त्यांना एलियनकडून भीती वाटली नाही, उलट एक प्रकारचा आपलेपणा वाटला. या दुसर्या घटनेत, एका स्त्रीसद़ृश एलियनने पार्करला सांगितलं की, ‘आम्ही माणसांना मारू शकत नाही. आमचा धर्म आणि परंपरा याची परवानगी देत नाहीत. म्हणूनच आम्ही ‘एड्स’सारखा रोग पसरवला, ज्यामुळे माणसं आपसातच एकमेकांना नष्ट करू लागली.’ या एलियनने आणखी एक महत्त्वाचं विधान केलं, ‘आम्ही पूर्वीही पृथ्वीवर होतो. आम्ही पिरॅमिड बांधले, विज्ञान आणि अभियांत्रिकी शिकवली; पण आता माणसांची स्वार्थी वृत्ती आम्हाला पुन्हा पृथ्वीवर यायला अडथळा ठरत आहे.’