TV Watching Death | टी.व्ही. पाहताना झाला मृत्यू; तब्बल ४२ वर्षांनंतर आढळला मृतदेह! 
विश्वसंचार

TV Watching Death | टी.व्ही. पाहताना झाला मृत्यू; तब्बल ४२ वर्षांनंतर आढळला मृतदेह!

पुढारी वृत्तसेवा

झाग्रेब : जरा विचार करा... एखादी व्यक्ती संध्याकाळी आपल्या खुर्चीवर बसून निवांत टी.व्ही. पाहत आहे, शेजारी चहाचा कप ठेवलेला आहे आणि पुढच्याच क्षणी तिचा श्वास थांबतो. त्याहूनही सुन्‍न करणारी बाब म्हणजे, पुढील तब्बल ४२ वर्षे या घटनेची कोणाला पुसटशी गंधवार्ताही लागत नाही! ऐकायला एखाद्या सिनेमाची कथा वाटेल; पण युरोपमधील क्रोएशिया देशात ही धक्कादायक घटना खरोखर घडली आहे.

‘डेली स्‍टार’च्या अहवालानुसार, ही कथा क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथे राहणाऱ्या हेडविगा गोलिक (Hedviga Golik) यांची आहे. १९२४ मध्ये जन्मलेल्या हेडविगा या आपल्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. शेजाऱ्यांच्या मते, त्या अत्यंत शांत स्वभावाच्या होत्या. १९६६ मध्ये शेजाऱ्यांनी त्यांना शेवटचे पाहिले होते. त्यानंतर त्या अचानक दिसेनाशा झाल्या. सुरुवातीला लोकांनी विचार केला की, कदाचित त्या शहर सोडून गेल्या असतील किंवा नातेवाईकांकडे राहायला गेल्या असतील. हळूहळू वेळ निघून गेला आणि लोकांनी त्यांच्याबद्दल विचार करणेही सोडून दिले. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, तब्बल चार दशके हेडविगा कुठे आहेत, हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यांचा फ्लॅट बंदच राहिला; पण कोणीही दरवाजा उघडून पाहिले नाही.

शेजारी आपापल्या आयुष्यात व्यस्त राहिले. या काळात कोणीही त्यांचा शोध घेतला नाही किंवा पोलिसांत तक्रारही नोंदवली नाही. २००८ मध्ये या फ्लॅटबाबत एक कायदेशीर वाद समोर आला. याच प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आणि न्यायालयाचे अधिकारी फ्लॅटवर पोहोचले. दरवाजा उघडत नसल्याने तो तोडून आत प्रवेश करण्यात आला. आत शिरताच समोरचे दृश्य पाहून अधिकारी स्तब्ध झाले. हेडविगा गोलिक आपल्या आवडत्या खुर्चीवर बसलेल्या स्थितीत होत्या. त्यांचे शरीर ब्लँकेटमध्ये लपेटलेले होते. समोर टी.व्ही. ठेवलेला होता आणि शेजारी चहाचा कप तसाच पडलेला होता. खोलीतील सामान पाहून जणू वेळ तिथेच थिजून गेल्याचा भास होत होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, टी.व्ही. पाहताना आणि चहा पितानाच हेडविगा यांचा अचानक मृत्यू झाला असावा. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने आणि त्या एकट्याच राहत असल्याने या घटनेची कोणालाच माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT