नवी दिल्ली : असं म्हणतात की, देव जेव्हा देतो, तो भरभरून देतो. असाच काहीसा प्रत्यय सौरभ दत्ता या तरुणाला आला आहे. सौरभचे नशीब फळफळले आहे. घराची साफसफाई करताना त्याला जणू 80 कोटींची लॉटरी लागली. अर्थात, सौरभ रात्रीतूनच श्रीमंत झाला असे नाही. त्याच्यामागे एक मोठी कहाणी आहे. तो श्रीमंत होण्यामागे त्याचे वडील आहेत. सौरभ एक दिवस त्याच्या घराची स्वच्छता करत होता. त्याला जुन्या कागदांच्या पुडक्यात 35 वर्षे जुनी कागदपत्रे सापडली. त्याला सुरुवातीला वाटले की, ही रद्दी आहे. पण, जेव्हा त्याने याविषयीची माहिती घेतली. त्यावेळी त्याला कळले की त्याच्या वडिलांनी 90 च्या दशकात शेअर खरेदी केले होते. आज त्या शेअर्सची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.
सौरभ दत्ता याने याविषयीची माहिती स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली. सौरभने पोस्टमध्ये लिहिले आहे की, मित्रांनो, माझ्या वडिलांनी जिंदाल कंपनीचे हे शेअर 1990 मध्ये खरेदी केले होते. तेव्हा या शेअर्सची किंमत एक लाख रुपये होती. हे शेअर खरेदी केल्यानंतर माझ्या वडिलांना त्याचा विसर पडला. हे पेपर्स घरातील एका कोपर्यात जवळपास 3 दशकांहून अधिक काळ तसेच पडून होते. त्याची कोणालाच आठवण उरली नाही.
एक दिवस घराची साफसफाई करताना हे पेपर सापडले. सुरुवातीला सर्वांना ते रद्दी कागद असल्याचे वाटले. पण, वडिलांनी हे पेपर्स पाहिल्यावर त्याची किंमत आता 80 कोटींच्या घरात पोहोचल्याचे समोर आले. हे शेअर्स जिंदल विजयनगर स्टील लिमिटेडचे आहेत. सौरभच्या वडिलांनी जवळपास 5000 शेअर्स खरेदी केले होते. पुढे ही कंपनी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत समाविष्ट करण्यात आली. तिचे विलीनीकरण झाले. याचा अर्थ आता या शेअर्सची किंमत ही जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरच्या हिशेबाने निश्चित होईल. जवळपास 30 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या या शेअर्सने आता दत्ता कुटुंबीयांना श्रीमंतांच्या पंगतीत आणून बसवले आहे. त्यावेळी सौरभच्या वडिलांनी हे 5000 शेअर्स एक लाख रुपयात खरेदी केले होते. आता त्यांची किंमत 80 कोटींहून सुद्धा अधिक असल्याचे समोर येत आहे.