50 Pani Puri Challenge | पठ्ठ्याने एका दमात फस्त केल्या 50 पाणीपुर्‍या! 
विश्वसंचार

50 Pani Puri Challenge | पठ्ठ्याने एका दमात फस्त केल्या 50 पाणीपुर्‍या!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतभरात पाणीपुरी आवडत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. कुठे याला गोलगप्पा म्हणतात, कुठे पुचका तर कुठे गुपचुप! याचे आंबट-गोड, तिखट पाणी आणि मसालेदार बटाट्याचा स्वाद लोकांना पाणीपुरीच्या गाडीकडे खेचून आणतोच. पण सध्या सोशल मीडियावर पाणीपुरीशी संबंधित एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने इंटरनेटवरील नेटकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाने चक्क 50 पाणीपुर्‍या खाण्याचे चॅलेंज पूर्ण करून 2500 रुपयांचे रोख बक्षीस जिंकले आहे.

सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे, सुरुवातीला हे चॅलेंज स्वीकारायला कोणीच तयार नव्हते. पण शेवटी एका तरुणाने हिंमत दाखवली आणि असा काही पराक्रम केला की चॅलेंज देणारा स्वतः चक्रावून गेला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ‘साहिल खान’ नावाचा एक कंटेंट क्रिएटर रस्त्यावरील लोकांना, ‘50 पाणीपुर्‍या खाणार का?‘ असा प्रश्न विचारताना दिसतो. सुरुवातीला लोक याला थट्टा समजून नकार देतात. पण जेव्हा त्यांना समजते की पाणीपुरी खाण्याच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत, तेव्हा लोकांचा रस वाढू लागतो.

व्हिडीओमध्ये साहिल सांगतो की, जो कोणी 50 पाणीपुर्‍या खाईल, त्याला प्रत्येक पाणीपुरीमागे 50 रुपये दिले जातील. या हिशोबाने चॅलेंज पूर्ण करणार्‍याला थेट 2500 रुपये मिळणार होते. बर्‍याच वेळानंतर एक तरुण हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी पुढे येतो. सुरुवातीला लोकांना वाटते की तो जास्त वेळ टिकू शकणार नाही. पण जसजशी पाणीपुर्‍यांची संख्या वाढू लागते, तसतसे लोकांचे डोळे विस्फारतात. व्हिडीओमध्ये तो तरुण एकापाठोपाठ एक पाणीपुरी तोंडात टाकत जातो. 20, 25 आणि थेट 35 पाणीपुर्‍यांचा टप्पा पार केल्यानंतरही तो थांबत नाही.

यादरम्यान साहिल खान त्याला मजेशीर भाषेत टोकताना दिसतो, पण त्या तरुणाचे पूर्ण लक्ष फक्त चॅलेंज पूर्ण करण्यावर असते. जेव्हा हा तरुण 45 व्या पाणीपुरीवर पोहोचतो, तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोकही त्याचा उत्साह वाढवू लागतात. अखेर तो 50 वी पाणीपुरीही संपवतो आणि हे चॅलेंज मोठ्या दिमाखात जिंकतो. चॅलेंज पूर्ण होताच साहिल खानला त्याला 2500 रुपयांची रोख रक्कम द्यावी लागते. बक्षीस मिळाल्यानंतर त्या तरुणाच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता, तर आजूबाजूचे लोकही त्याचे कौतुक करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT