Heart-Shaped Memorial | सहा हजार झाडे लावून बनवले पत्नीचे ‘हृदय’स्पर्शी स्मारक! 
विश्वसंचार

Heart-Shaped Memorial | सहा हजार झाडे लावून बनवले पत्नीचे ‘हृदय’स्पर्शी स्मारक!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : बादशाह शाहजहानने प्रिय पत्नी असलेल्या मुमताजमहलसाठी ताजमहाल बनवला. अर्थात, पत्नीच्या आठवणीत असामान्य स्मारक बनवणारा हाच अखेरचा माणूस होता असे नाही! इंग्लंडमधील साऊथ ग्लॉस्टरशायर परिसरातील शेतकरी विन्स्टन हॉवेस यांची कहाणी याचं सुंदर उदाहरण आहे. पत्नीच्या निधनानंतर तिच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी तब्बल ६ हजार ओकची झाडं लावून हृदयाच्या आकाराचं जंगल उभं केलं.

विन्स्टन आणि त्यांची पत्नी जेनेट यांचं १९६२ मध्ये लग्न झालं होतं. तब्बल ३३ वर्षांचा संसार केल्यानंतर १९९५ मध्ये जेनेट यांचं अचानक निधन झालं. पत्नीच्या जाण्याने विन्स्टन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्यांनी त्या दुःखाला वेगळं रूप देण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या आठवणींना कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात ओकची रोपं लावण्यास सुरुवात केली. एक-दोन नाही तर तब्बल ६ हजार झाडं त्यांनी लावली. सुमारे सहा एकर परिसरात ही झाडं वाढत गेली आणि काही वर्षांतच तिथे दाट जंगल तयार झालं. मात्र, जंगलाच्या मध्यभागी त्यांनी मुद्दाम एक मोठी मोकळी जागा ठेवली.

या मोकळ्या जागेचा आकार होता हृदयासारखा. या हृदयाकृती जागेचं टोक जेनेट ज्या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या, त्या त्यांच्या बालपणातील घराच्या दिशेने ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे हे केवळ झाडांचं जंगल नव्हतं तर पत्नीच्या आठवणींना दिलेलं एक जिवंत स्मारक होतं. विशेष म्हणजे, हे प्रेमाचं अनोखं स्मारक जवळपास १७ वर्षे जगाच्या नजरेपासून दूर राहिलं. जमिनीवरून पाहिलं तर तिथे फक्त दाट जंगल दिसत होतं. मात्र, २०१२ मध्ये एका हॉट-एअर बलूनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून या जंगलाचा हृदयाकृती आकार आला आणि विन्स्टन यांची ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आली. विन्स्टन यांनी या हृदयाच्या मोकळ्या जागेत एक लाकडी बाकही ठेवला होता. ते अनेकदा तिथे शांतपणे बसून पत्नीच्या आठवणींमध्ये रमायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT