मरदान (पाकिस्तान) : जरा विचार करा, ज्या व्यक्तीला कुटुंबीयांनी 17 दिवसांपूर्वी मृत समजून रीतसर दफनविधी उरकला, तीच व्यक्ती अचानक दुसरीकडे ढिगार्याखालून जिवंत बाहेर आली तर? ही कल्पना करणेही कठीण आहे, पण अशीच एक थरारक आणि विस्मयकारक घटना प्रत्यक्षात घडली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात ही घटना समोर आली असून, संबंधित मजूर जिवंत असल्याची बातमी मिळताच सर्वांचेच डोळे विस्फारले.
31 मार्च रोजी खैबर पख्तुनख्वा राज्यातील मरदान जिल्ह्यातील रुस्तम भागात एका संगमरवरी खाणीत काम सुरू असताना अचानक दरड कोसळली. या खाणीत एकूण 12 मजूर काम करत होते, त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला, तर दोनजण जखमी अवस्थेत सापडले. मात्र, अब्दुल वहाब नावाचा एक मजूर बेपत्ता होता, त्याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात होता. अनेक दिवसांच्या शोधानंतर ढिगार्यात एक मृतदेह सापडला होता. तो मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला असल्याने केवळ कपड्यांवरून कुटुंबाने तो अब्दुल वहाबचा असल्याचे गृहीत धरले आणि 17 दिवसांपूर्वी त्याच्यावर अंत्यसंस्कार (दफनविधी) केले. मात्र, प्रत्यक्षात तो मृतदेह कोणा दुसर्याचाच होता.
खाणीत अद्याप काही लोक बेपत्ता असल्याने जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरूच होती. तिथे काम करणारे नजीबुल्लाह यांनी सांगितले की, ‘आम्ही वहाबचा जनाजाही काढला होता आणि प्रार्थनाही केली होती, पण आज 17 दिवसांनंतर शोधकार्य सुरू असताना ढिगार्याखालून अचानक एक आवाज आला, ‘मी जिवंत आहे, मला बाहेर काढा!’ हा आवाज ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनी मशिनरी थांबवून हाताने ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. काही वेळाने अब्दुल वहाब जिवंत अवस्थेत बाहेर आला. 17 दिवस अन्नाशिवाय आणि काळोखात मृत्यूशी झुंज देऊन बाहेर आलेल्या वहाबला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, या ‘चमत्कारा’ची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.