नोएडा : अतिप्रमाणत वाढलेला ताण, मानसिक थकवा आणि अपुरी झोप यामुळे आजकाल बहुतांश लोकांना दिवसभर आळस आणि अशक्तपणा जाणवतो. वाढते वजन आणि लठ्ठपणा हा थकवा अधिक वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर आपण आपल्या जीवनशैलीत आणि आहारात छोटे आणि किरकोळ बदल केले, तर ते आरोग्यासाठी गेम चेंजर (मोठा बदल घडवणारे) ठरू शकतात. मेदांता नोएडा येथील ‘डायटरी सर्व्हिसेस’च्या निधी सहाय यांच्या मते, जर तुम्ही रोज सकाळी मखाणा खाण्यास सुरुवात केली, तर आरोग्याला अनेक उत्तम फायदे मिळतात.
मखाण्यामध्ये असलेले हाय प्रोटीन, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटस् हे पोषक घटक वजन कमी करण्यास, ताणतणाव, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह (डायबिटीज) आणि निस्तेज त्वचा यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. यामुळेच आजच्या काळात एक ‘हेल्दी स्नॅक्स’ म्हणून लोकांना मखाणा खूप आवडत आहे. सकाळी मखाणा खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो शरीराला सतत ऊर्जा पुरवतो. मखाण्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस् असतात जे हळूहळू पचतात, ज्यामुळे रक्तामध्ये ग्लुकोज संथ गतीने सोडले जाते. यामुळे गोड नाश्ता केल्यानंतर अचानक जाणवणारी थकव्याची समस्या उद्भवत नाही. व्यस्त व्यावसायिक, विद्यार्थी आणि वृद्धांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
एक निरोगी पचनसंस्था संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाची असते. मखाण्यातील फायबरचे प्रमाण पोट साफ ठेवण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. सकाळी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात. मखाण्यामध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करून रक्तदाब नियंत्रित ठेवते. तसेच, मॅग्नेशियम हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. यात सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असल्याने हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर स्नॅक आहे. मखाणा हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतो. वाढत्या वयासोबत, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी सकाळी मखाणा खाल्ल्याने कॅल्शियमची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. यातील मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांची घनता टिकवून ठेवतात.