विश्वसंचार

कोरोनाने अनेक भारतीयांना दिले फुप्फुसाचे दुखणे!

Arun Patil

नवी दिल्ली : अनपेक्षितपणे जगभरातील लोकांच्या आयुष्यात कोरोना महामारीचा प्रवेश झाला. या महामारीत अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेकांनी 'कोव्हिड-19'वर मात करण्यात यशही मिळवले. काहींना बरे झाल्यावरही काही समस्यांचा सामना करावा लागला. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, कोरोना महामारीमुळे अनेक भारतीयांची फुप्फुसे खूप कमकुवत झाली आहेत. क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोरने केलेल्या एका अहवालानुसार, अनेकांची कोव्हिड-19 मुळे फुप्फुसे कमजोर झाली आहेत. युरोपीय आणि चीन नागरिकांच्या तुलनेने भारतीयांना अधिक नुकसान सोसावे लागले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या नोंदीनुसार, काही जण वर्षभरातच बरे झाले आहेत, तर काहींना आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागणार आहे.

या संशोधनासाठी 207 लोकांच्या फुप्फुसांचे निरीक्षण करण्यात आले. ज्या रुग्णांना सौम्य व तीव्र स्वरूप किंवा गंभीर स्वरूपाचा कोव्हिड झाला होता. त्यांच्या फुप्फुसाचे निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी त्यांना सहा मिनिटांचे वॉक टेस्ट, ब्लड टेस्ट आणि बॉडी चेकअप करण्यात आले. सर्वात जास्त संवेदनशील फुप्फुसांची तपासणी करण्यात आली. याला गॅस ट्रान्स्फर असे म्हटले जाते. याच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन खेचण्याची क्षमता मोजली जाते. या तपासणीत आढळून आले की, 44 टक्के लोकांच्या फुप्फुसांचे नुकसान झाले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती खूपच चिंताजनक आहे. 35 टक्के लोकांच्या फुप्फुसांना कमी नुकसान पोहोचले आहे. 35 टक्के लोकांची फुप्फुसे आकुंचित पावली आहेत. म्हणजेच ऑक्सिजन घेताना फुप्फुस पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. 8.3 टक्के लोकांना श्वास घेताना त्रास होण्याचे निरीक्षण आढळले आहे.

या अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सीएमएस वेल्लोरच्या पल्मोनरी विभागाच्या डॉ. डीजे क्रिस्टोफर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रुग्णांमध्ये चीन व युरोपीयन रुग्ण्यांच्या तुलनेत फुप्फुसांचे अधिक नुकसान झाले आहे. त्याव्यतिरिक्त चीन आणि युरोपातील लोकांच्या तुलनेत भारतीयांना मधुमेह आणि हायपर टेन्शनचा त्रासही अधिक जाणवतो. नैनवती रुग्णालयाचे पल्मोनोलॉजीचे वरिष्ठ डॉक्टर सलील बेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिडच्या काही रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर 8-10 दिवसांनंतर रुग्णालयात दाखल झाले. ऑक्सिजन सपोर्ट आणि स्टेरॉईडचे उपचार घेतल्यानंतर संसर्ग जरी कमी झाला असला तरी फुप्फुसात फायब्राेसिस निर्माण झाले. त्यानंतर 95 टक्के लोकांचे फुप्फुसाचे आजार हळूहळू कमी झाले. मात्र, अजूनही 4-5 टक्के रुग्णांना दीर्घकाळापासून श्वास घेण्याची समस्या निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT