पॅरिस : जगभरात अनेक प्रसिद्ध संग्रहालये आहेत, जी त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. पॅरिसमधील लूव संग्रहालय हे त्यापैकीच एक असून, ते कला, सौंदर्य आणि भव्यतेसाठी जगप्रसिद्ध आहे. याच संग्रहालयात लिओनार्डो दा विंची या महान कलाकाराने बनवलेले पेंटिंग ‘मोनालिसा’ ठेवलेले आहे. या खास संग्रहालयाला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, ज्यामुळे ते जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे संग्रहालय ठरले आहे. मात्र, हे प्रसिद्ध संग्रहालय कर्मचार्यांच्या संपामुळे नुकतेच बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे संग्रहालय कोणत्याही नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा आणीबाणीमुळे नव्हे, तर तेथील कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे बंद करण्यात आले आहे. 16 जून रोजी या संग्रहालयातील कर्मचारी संपावर गेले. संग्रहालयात सतत वाढणार्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षक आणि तिकीट एजंटस्सारख्या कर्मचार्यांनी काम करण्यास नकार दिला. सीजीटी-कल्चर युनियनच्या सारा सेफियन यांनी सांगितले की, ‘आम्ही मदतीसाठी आणखी वाट पाहू शकत नाही. आमची टीम सध्या प्रचंड दबावाखाली आहे. हा केवळ कलेचा प्रश्न नाही, तर तिचे जतन करणार्या लोकांचाही प्रश्न आहे.’ येथे काम करणार्या कर्मचार्यांनी पर्यटकांची प्रचंड गर्दी, अपुरे कर्मचारी आणि कामाच्या कठीण परिस्थितीचा निषेध करत काम बंद केले.
2024 मध्ये पॅरिसच्या या संग्रहालयाला 8.7 दशलक्ष लोकांनी भेट दिली, जी त्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट आहे. कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, येथे विश्रांतीसाठी जागेची कमतरता आहे, शौचालये अपुरी आहेत आणि काचेच्या पिरॅमिडमुळे उन्हाळ्यात प्रचंड गरम होते. यामुळे, हजारो पर्यटकांना तिकीट असूनही बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. कारण, गॅलरी गार्ड आणि तिकीट एजंटस्नी काम करण्यास नकार दिला होता.
कर्मचार्यांच्या मते, या प्रचंड गर्दीचे मुख्य कारण मोनालिसाचे 16 व्या शतकातील चित्र आहे. हे चित्र पाहण्यासाठी आणि त्यासोबत सेल्फी घेण्यासाठी दररोज सुमारे 20,000 लोक संग्रहालयाच्या सर्वात मोठ्या खोलीत गर्दी करतात. यामुळे अनेकदा गोंधळ, धक्काबुक्की होते आणि इतकी गर्दी होते की, अनेक लोक जवळच असलेल्या टिटियन आणि वेरोनीज यांच्या सुंदर कलाकृतींकडे लक्षही देत नाहीत, ज्या बर्याच अंशी दुर्लक्षित राहतात.