लंडन : होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक आहे. सध्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठ्यावर होत असलेल्या परिणामांमुळे हा मार्ग चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या अरुंद जलमार्गावरील वाढत्या तणावामुळे त्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित झाले आहे. पण, हजारो किलोमीटर दूर असूनही या सागरी मार्गाचा हिमालयाशी एक भौगोलिक संबंध आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे.
या दोन्ही क्षेत्रांची उत्पत्ती प्राचीन ‘टेथिस’ समुद्रातून झाली आहे, जो एकेकाळी पृथ्वीवरील दोन महाकाय भूभागांच्या दरम्यान अस्तित्वात होता. लाखो वर्षांच्या टेक्टोनिक प्लेटस्च्या हालचालींमुळे या अफाट महासागराचे रूपांतर पश्चिमेकडे एका अरुंद सामुद्रधुनीत आणि पूर्वेकडे जगातील सर्वात उंच पर्वत रांगेत झाले. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे स्वरूप आजच्यापेक्षा वेगळे होते. स्वतंत्र खंडांऐवजी ‘लॉरेशिया’ उत्तरेला आणि ‘गोंडवाना’ दक्षिणेला असे दोन मोठे भूभाग होते. त्यांच्यामध्ये ‘टेथिस’ नावाचा एक विशाल समुद्र पसरलेला होता.
काळाच्या ओघात पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील प्लेटस् हलू लागल्या. ‘अरेबियन प्लेट’ उत्तरेकडे ‘युरेशियन प्लेट’च्या दिशेने सरकू लागली आणि समुद्राचा आकार बदलू लागला. अरेबियन प्लेट उत्तरेकडे सरकत असताना टेथिस समुद्राचा पश्चिम भाग हळूहळू आकुंचन पावू लागला. या प्रक्रियेतूनच होर्मुझच्या सामुद्रधुनीची निर्मिती झाली, जी पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडते. याच प्लेटस्च्या टक्करीमुळे सध्याच्या इराणमधील ‘झाग्रोस’ पर्वत रांगही तयार झाली. लाखो वर्षांच्या कालावधीत, या भागातील उरलेला समुद्र एका अरुंद वाहिनीमध्ये रूपांतरित झाला, ज्याला आज आपण जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग म्हणून ओळखतो. पूर्वेकडेही अशीच एक भौगोलिक प्रक्रिया घडली.
सुमारे 4 ते 5 कोटी वर्षांपूर्वी, ‘इंडियन प्लेट’ची ‘युरेशियन प्लेट’शी धडक झाली. दोन्ही प्लेटस् भूखंडीय असल्याने त्या एकमेकांच्या खाली गाडल्या गेल्या नाहीत. त्याऐवजी, जमीन दुमडली गेली आणि वर उचलली गेली. या धडकेमुळे दोन्ही प्लेटस्च्या दरम्यान असलेला समुद्राचा गाळ अडकला गेला. चिखल, चूनखडी आणि सागरी जीवाश्मांचे थर लाखो वर्षांपासून वर ढकलले गेले आणि त्यातून हिमालय पर्वत रांगेची निर्मिती झाली. आजही माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर सागरी जीवाश्म आढळतात, जे हे सिद्ध करतात की ही शिखरे एकेकाळी प्राचीन समुद्रतळाचा भाग होती.