न्यूयॉर्क : ब्रह्मांडात ‘नॉर्मल मॅटर’ म्हणजे आपल्याला दिसणारी आणि मोजता येणारी सामान्य वस्तू सुमारे 15 टक्के अस्तित्वात आहे, असे खगोलशास्त्रज्ञ मानतात. पण या सामान्य वस्तूंपैकी अर्ध्याहून अधिक भाग अद्यापही थेट पाहता आला नव्हता. ना तार्यांमध्ये, ना आकाशगंगा संरचनांमध्ये, ना आपल्या दुर्बिणींना सहज सापडणार्या कुठल्याही खगोलीय घटकांमध्ये! आता, एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने असे दाखवून दिले आहे की, बर्याच आकाशगंगांना वेढणार्या हायड्रोजन वायूचे अत्यंत विरळ पण विशाल स्वरूप यासाठी जबाबदार असू शकते. या विरळ वायूचे प्रमाण इतके मोठे आहे की, तोच हरवलेला ‘नॉर्मल मॅटर’ असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेचे खगोलशास्त्रज्ञ सायमोन फेरारो यांनी सांगितले की, ‘आमच्या मापनांमुळे असं दिसून आलं की हा हिरवलेला वायू शोधण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’ ही माहिती सध्या arXiv प्रीप्रिंट सर्व्हरवर उपलब्ध आहे आणि लवकरच ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. या संशोधनासाठी दोन महत्त्वाची साधने वापरण्यात आली : Dark Energy Spectroscopic Instrument (DESI) अरिझोना येथील Kitt Peak National Observatory मध्ये कार्यरत. Atacama Cosmology Telescope चिलीच्या अटाकामा वाळवंटात स्थित. DESI द्वारे, संशोधकांनी सुमारे 7 दशलक्ष आकाशगंगांचे चित्र एकत्र करून त्यांच्या सीमारेषेवर असलेल्या आयोनाईज्ड हायड्रोजन वायूच्या अत्यंत फिकट ‘हॅलो’चा मागोवा घेतला. हे हॅलो सामान्य दुर्बिणींना सहज दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना थेट न पाहता, त्यांनी कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड, बिग बँगनंतर उरलेली पार्श्वभूमी किरणे, यामधून जाणार्या प्रकाशावर या वायूने केलेल्या परिणामाचा अभ्यास केला. वायूमुळे ह्या CMB किरणांच्या चमकदारपणामध्ये बदल होतो आणि त्यावरून वायूचं अस्तित्व आणि प्रमाण मोजता येते.
ही शोधमोहीम यशस्वी ठरली, तर गेल्या अनेक दशकांपासून असलेले एक खगोलशास्त्रीय गूढ, ‘हरवलेली सामान्य वस्तू कुठे आहे?’ याचं उत्तर सापडू शकतं. हा शोध ब्रह्मांडाची रचना समजून घेण्याच्या द़ृष्टीने एक मोठे पाऊल ठरू शकते. जर हायड्रोजन वायूचे हे अति-विरळ जाळे खरोखर इतकं व्यापक आहे, तर आपल्या ब्रह्मांडाची कल्पना आणि मापन, दोन्ही नव्याने तपासावी लागतील!