मनीला : फिलीपिन्समध्ये शंभरहून अधिक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक दुर्मीळ प्रजातीचे फूल पुन्हा एकदा उमलले आहे. ‘मसुंगी जिओरिझर्व्ह’ ने दिलेल्या माहितीनुसार, इतिहासाच्या पानांत नामशेष मानले गेलेले ‘एक्स्कम लोहेरी’ (Exacum loheri) हे फूल रिझल प्रांतातील एका संरक्षित मार्गावर मोठ्या प्रमाणावर फुललेले आढळून आले आहे. ही वनस्पती केवळ फिलीपिन्सच्या काही विशिष्ट भागांतच आढळते. मसुंगीच्या जंगलात सुमारे १३० वर्षांनंतर हे ‘हरवलेले’ फूल पुन्हा पाहायला मिळाले आहे.
‘एक्स्कम लोहेरी’ ही एक क्लोरोफिलरहित (Achlorophyllous) आणि मायकोहेटेरोट्रॉफिक्स (Mycoheterotrophic) वनस्पती आहे. याचा अर्थ या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य (Chlorophyll) नसते. त्यामुळे अन्न किंवा पोषक तत्त्वे मिळवण्यासाठी ही वनस्पती प्रकाशसंश्लेषणावर नव्हे, तर मातीत पसरलेल्या बुरशीवर अवलंबून असते. १८९५ मध्ये स्वित्झर्लंडचे वनस्पतीशास्त्रज्ञ ऑगस्ट लोहेर यांनी फिलीपिन्सच्या रिझल प्रांतात पहिल्यांदा या वनस्पतीचा शोध लावला होता. काळाच्या ओघात ही वनस्पती नामशेष झाल्याचे मानले जात होते आणि केवळ एका शतकापूर्वीच्या ऐतिहासिक नोंदींमध्येच तिचा उल्लेख उरला होता. मात्र, गेल्या वर्षी मसुंगीच्या चुनखडीच्या जंगलात गोगलगायींवरील एका सर्वेक्षणादरम्यान ही वनस्पती पुन्हा आढळून आली.
संशोधकांनी या छोट्या निळ्या-जांभळ्या रंगाच्या फुलांची छायाचित्रे टिपली, ज्यामुळे १३० हून अधिक वर्षांनंतर ‘एक्स्कम लोहेरी’ची पहिली अधिकृत नोंद झाली. त्यावेळी संशोधकांनी सांगितले होते की, अत्यंत मर्यादित अधिवासामुळे ही प्रजाती खूपच दुर्मीळ आणि धोक्यात आलेली असावी. या महत्त्वाच्या शोधानंतर एका वर्षाने, आता मसुंगीच्या ‘डिस्कव्हरी ट्रेल’च्या कडेला ‘एक्स्कम लोहेरी’ची आणखी काही झाडे फुललेली दिसली आहेत. यामुळे ही लुप्त झालेली प्रजाती पुन्हा एकदा बहरू शकते, अशी आशा तज्ज्ञांना वाटत आहे. मसुंगी जिओरिझर्व्हने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आपल्या ओळखीच्या ठिकाणीही अशा अनेक प्रजाती असू शकतात ज्यांच्या शोधाची, अभ्यासाची आणि संरक्षणाची गरज आहे, याची आठवण ही घटना करून देते. कधी कधी निसर्गाचे संरक्षण करणे म्हणजे विज्ञानाच्या नजरेतून निसटलेल्या प्रजातींना पुन्हा फुलण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे होय.’