Ganeshotsav | धगधगत्या ज्वालामुख्यावर विराजमान बाप्पा  
विश्वसंचार

Ganeshotsav | धगधगत्या ज्वालामुख्यावर विराजमान बाप्पा

७०० वर्षांपासून माऊंट ब्रोमोचे रक्षण करतोय विघ्नहर्ता

पुढारी वृत्तसेवा

जकार्ताः एकीकडे हजारो फूट उंचावरून भयानक गर्जनेसह आग, धूर आणि लाव्हा ओकणारा धगधगता ज्वालामुखी, तर दुसरीकडे त्याच ज्वालामुख्याच्या तोंडावर शांतपणे विराजमान झालेले आपले ‘विघ्नहर्ता’ श्रीगणेश. कोणत्याही सक्रिय ज्वालामुख्याच्या शिखरावर वसलेली श्रीगणेशाची ही जगातील एकमेव मूर्ती आहे. बाप्पा इथे केवळ दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे रक्षण करत नाहीत, तर ते या संपूर्ण परिसराचे रक्षक आणि अधिपती मानले जातात. इंडोनेशियातील धोक्यांनी वेढलेल्या ‘माऊंट ब्रोमो’वर गेल्या ७०० वर्षांपासून स्थापित गजानन भक्तांना अभय देत जणू सांगतात, ‘भिण्याचे काहीच कारण नाही, मी इथे साक्षात उपस्थित आहे.’

सनातन धर्माच्या मान्यतांनुसार, केवळ देवाधिदेव महादेवच पर्वतांवर वास करत नाहीत, तर त्यांचे दोन्ही सुपुत्र श्रीगणेश आणि कार्तिकेयदेखील दूरवरच्या उंच टेकड्यांवर आणि पर्वतांवर विराजमान आहेत. इंडोनेशियातील प्रसिद्ध आणि अत्यंत सक्रिय अशा ‘माऊंट ब्रोमो’ ज्वालामुखीच्या अगदी काठावर श्रीगणेशाची ही अलौकिक मूर्ती स्थापित आहे. गणेशोत्सवाच्या काळात जेव्हा जगभरात लाखो भक्त बाप्पाची स्थापना करतात, तेव्हा देशापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या या अनोख्या गणेशधामाची कथा जाणून घेणे रंजक ठरते. इंडोनेशियाच्या पूर्व जावा भागात स्थित माऊंट ब्रोमो परिसरात एकूण ७ ज्वालामुखी आहेत. परंतु, त्यापैकी हा एकच आजही पूर्णपणे सक्रिय आहे.

या ज्वालामुख्याच्या शिखरावर स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळेच हजारो फूट कठीण चढण पार करून भाविक इथे दर्शनासाठी येतात. भाविक बाप्पाला फळे, फुले आणि अगदी जिवंत प्राणीही नवस म्हणून अर्पण करतात. इंडोनेशियन इतिहासकारांच्या मते, ही मूर्ती सुमारे ७०० वर्षे जुनी असून, तिची स्थापना स्थानिक ‘तेंगगेर’ आदिवासी समाजाने केली होती. माऊंट ब्रोमोच्या आसपासच्या सुमारे ४८ गावांमध्ये हिंदू धर्मीय लोक राहतात. हे लोक १२ व्या शतकातील प्रसिद्ध ‘माजापाहित’ साम्राज्याचे वंशज मानले जातात. स्थानिक नागरिकांच्या श्रद्धेनुसार, भगवान गणेश इथे केवळ मूर्तीरूपात नसून त्यांचे रक्षक म्हणून साक्षात उपस्थित आहेत. जोपर्यंत बाप्पा या ज्वालामुख्याच्या शिखरावर विराजमान आहेत, तोपर्यंत हा लाव्हा ओकणारा ज्वालामुखी त्यांची गावे आणि पिके नष्ट करू शकत नाही, अशी मान्यता शतकानुशतके चालत आली आहे.

बाप्पाचा आशीर्वादच त्यांना प्रत्येक नैसर्गिक आपत्तीपासून वाचवतो, असा इथल्या लोकांचा दृढ विश्वास आहे. इंडोनेशिया हा आज जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असला, तरी तिथल्या संस्कृतीत आणि परंपरेत भारतीय पौराणिक वारशाची झलक स्पष्टपणे दिसते. ज्या पर्वतावर बाप्पा विराजमान आहेत, त्या ‘ब्रोमो’ शब्दाची उत्पत्ती मुळात ‘ब्रह्मा’ या नावावरून झाली आहे. स्थानिक बोलीभाषेत ब्रह्मा देवांना ‘ब्रोमो’ म्हटले जाते. पर्वताची चढण सुरू होते, त्या ठिकाणी काळ्या दगडांनी बांधलेले ९ व्या शतकातील एक प्राचीन ब्रह्मा मंदिरही स्थित आहे. या पवित्र स्थळी आजच्या काळातही शास्त्रोक्त पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते. स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त परदेशी पर्यटक आणि भाविक सर्व धोक्यांची पर्वा न करता दुर्गम वाटांवरून ज्वालामुख्याच्या शिखरापर्यंत पोहोचतात. बाप्पाला हार-फुले वाहून, धूप-दीप लावून फळांचा नैवेद्य दाखवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT