लंडन : आपण अनेकदा एकटेपणा घालवण्यासाठी किंवा कामाच्या ओघात एआय चॅटबॉटस्शी तासन्तास संवाद साधतो. मात्र, शास्त्रज्ञांनी आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. एका नवीन संशोधनानुसार, एआय टूल्स नकळतपणे मानवी मनातील चुकीच्या धारणा किंवा भमांना अधिक खतपाणी घालत आहेत. तज्ज्ञांनी या स्थितीला ‘एआय एसोसिएटेड डेल्यूजन’ म्हणजेच ‘एआयशी संबंधित भम’ असे नाव दिले आहे.
‘द लॅन्सेट सायकॅट्री’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाचे नेतृत्व डॉ. हॅमिल्टन मॉरिन यांनी केले आहे. त्यांच्या मते, चॅटबॉटस् थेट मानसिक आजार (सायकोसिस) निर्माण करत नाहीत. परंतु जे लोक आधीच मानसिकदृष्ट्या संवेदनशील आहेत, त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरू शकतात. जेव्हा एखादा युजर आपली चुकीची किंवा विचित्र कल्पना चॅटबॉटसमोर मांडतो, तेव्हा एआय त्याला विरोध करण्याऐवजी अनेकदा त्याचे समर्थन करू लागतो. यामुळे युजरला वाटते की, तो जे विचार करत आहे, ते अगदी सत्य आहे. तीन प्रकारचे भम आहेत. सर्वात सामान्य: अभ्यासात असे दिसून आले आहे की, चॅटबॉटस् प्रामुख्याने तीन प्रकारच्या भमांना प्रोत्साहन देत आहेत :
1. अहंकार किंवा मोठेपणाचा भम : युजरला असे वाटू लागते की, त्याच्याकडे काही दैवी शक्ती आहे किंवा तो एखाद्या विशेष ‘कॉस्मिक’ मिशनवर आहे. जुने एआय मॉडेल्स अनेकदा गूढ भाषेचा वापर करून ही भावना अधिक दृढ करतात.
2. रोमँटिक भम : एखाद्या मशिन किंवा काल्पनिक पात्रासोबत खोल प्रेमात असल्याचा भास होणे. 3. पॅरानोइड (संशयी वृत्ती) : कोणीतरी आपला पाठलाग करत आहे किंवा आपल्याविरुद्ध कट रचत आहे, असा विनाकारण भीतीवजा संशय वाटणे. डॉ. रागी गिरगिस आणि डॉ. क्वामे मॅकेंजी यांच्या मते, जे लोक मानसिक आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, त्यांना सर्वात जास्त धोका आहे. सामान्यतः व्यक्तीला स्वतःच्या चुकीच्या विचारांवर थोडी शंका असते, पण जेव्हा चॅटबॉट एखाद्या मित्राप्रमाणे बोलून त्या विचारांना पाठिंबा देतो, तेव्हा त्या शंकेचे रूपांतर पक्क्या विश्वासात होते. एकदा ही स्थिती पक्की झाली की, ती सुधारणे जवळपास अशक्य होते.
डॉ. डोमिनिक ऑलिव्हर यांच्या मते, एआय केवळ माहिती देत नाही, तर तो एक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे माणसाला वाटते की कोणीतरी आपल्याला समजून घेत आहे आणि हीच बाब भमाची प्रक्रिया अधिक वेगवान करते.