Future Train | भविष्यातील प्रवास असेल स्वप्नवत ...अशी असेल 2075 ची ट्रेन! Pudhari File Photo
विश्वसंचार

Future Train | भविष्यातील प्रवास असेल स्वप्नवत ...अशी असेल 2075 ची ट्रेन!

लंडन अँड नॉर्थ ईस्टर्न रेल्वेने मांडली संकल्पना

पुढारी वृत्तसेवा

लंडन : रेल्वे प्रवासातील उशीर, गर्दी आणि रद्द होणार्‍या गाड्यांचा त्रास लवकरच इतिहासजमा होऊ शकतो. भविष्यातील रेल्वे प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याचे साधन न राहता, तो प्रवाशांच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची काळजी घेणारा एक ‘सर्वांगीण अनुभव’ असेल. लंडन अँड नॉर्थ ईस्टर्न रेल्वे (एलएनईआर) या कंपनीने 2075 सालच्या ‘भविष्यातील ट्रेन’ची एक रोमांचक संकल्पना मांडली आहे. आधुनिक रेल्वेच्या 200 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त, एलएनईआरने दोन हजार प्रवाशांचे सर्वेक्षण करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्याआधारे भविष्यातील रेल्वे कशी असेल, याचे एक चित्र रेखाटले आहे.

काय असेल भविष्यातील ट्रेनमध्ये?

ही ट्रेन एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील वाटावी अशी असेल, ज्यात तंत्रज्ञान आणि आरामाची अनोखी सांगड घातलेली असेल.

आराम आणि आरोग्य : प्रवाशांना छतापासून जमिनीपर्यंतच्या मोठ्या खिडक्यांमधून बाहेरील निसर्गरम्य द़ृश्यांचा आनंद घेता येईल. प्रवासात झोप घेण्यासाठी खास ‘नॅप पॉडस्’ असतील. एवढेच नाही, तर ज्यांना प्रवासातही व्यायाम करायचा आहे, त्यांच्यासाठी ‘ट्रेडमिल सीट’चा पर्यायही उपलब्ध असेल.

स्मार्ट सुविधा : तुमच्या आवडीनुसार तापमान आणि सीटची द़ृढता बदलणार्‍या ‘स्मार्ट सीटस्’ असतील. रेल्वे स्थानकांवरील तिकीट तपासणीसाठी आता ‘फेस रेकग्निशन’ (चेहर्‍याद्वारे ओळख) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

कुटुंब आणि पाळीव प्राणी : कुटुंबासाठी खास ‘प्लेरूम’ (खेळण्याची जागा) आणि पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र ‘पेट झोन’ असतील, त्यामुळे प्रवाशांचे लाडके प्राणीही आरामात प्रवास करू शकतील.

तंत्रज्ञानाचा अनुभव : खिडक्या या साध्या काचेच्या नसून ‘ऑगमेंटेड रिलिटी’ युक्त असतील. या खिडक्यांमधून दिसणार्‍या द़ृश्यांवरच त्या ठिकाणाचा इतिहास आणि प्रवासाची थेट माहिती दिसेल. स्टेशनवर प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी ‘स्मार्ट ग्लासेस’ मदत करतील, जे तुमच्या डोळ्यासमोरच योग्य मार्ग दाखवतील.

प्रवाशांच्या इतर अपेक्षा : प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार या संकल्पनेत आणखी काही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. सिनेमा हॉलसारखी ऑनबोर्ड करमणूक, आरोग्यासाठी खास ‘वेलनेस कॅरेज’, वास न येणारे जेवण, वेगवेगळ्या मानसिक गरजा असलेल्या प्रवाशांसाठी अनुकूल जागा.

‘भविष्यातील ट्रेन’ या संकल्पनेवर एलएनईआर सोबत काम करत असलेले तज्ज्ञ टॉम चीजराईट म्हणतात, भविष्यातील रेल्वे प्रवास सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत सहज आणि सोपा असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), तिकीटविरहित प्रवास आणि आकर्षक डिझाइनमुळे हा अनुभव एखाद्या विज्ञान-कथेसारखा असेल.

मात्र, या सर्व भविष्यवेधी कल्पनांमध्ये एका गोष्टीचा उल्लेख नाही, तो म्हणजे भविष्यातील तिकीटाची किंमत!

ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता यावी, यासाठी एलएनईआरने 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान लंडनच्या किंग्ज क्रॉस स्टेशनवर ‘ट्रेन ऑफ द फ्युचर’चे एक प्रदर्शन आयोजित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT