रुमानियामध्ये आहेत वाढणारे ‘जिवंत’ दगड! Pudhari File Photo
विश्वसंचार

रुमानियामध्ये आहेत वाढणारे ‘जिवंत’ दगड!

हे असे दगड आहेत जे पावसाच्या पाण्यातून खनिजे शोषून घेऊन आपला आकार वाढवतात

पुढारी वृत्तसेवा

लंडन : निसर्गही अनेक वेळा थक्क करणार्‍या गोष्टी दाखवत असतो. अमेरिकेतील ‘डेथ व्हॅली’मध्ये आपल्या जागेवरून अनेक किलोमीटर पुढे सरकत जाणारे आणि मागे त्याच्या सरकण्याच्या खुणा ठेवणारे दगड पाहायला मिळतात. रुमानियामध्ये तर ‘जिवंत’ म्हणवले जाणारे दगड आढळतात. या दगडांना ‘ट्रोवंटस्’ असे म्हटले जाते. हे असे दगड आहेत जे पावसाच्या पाण्यातून खनिजे शोषून घेऊन आपला आकार वाढवतात. या दगडांना अनेक लोक डायनासोरची अंडी, वनस्पतींचे जीवाश्म आणि काहीजण तर एलियन्सनी बनवलेली रचनाही समजत होते!

मध्य रुमानियातील कोस्टेस्टी नावाच्या गावाजवळ असे अनेक दगड पाहायला मिळतात. केवळ याच देशात असे दगड आहेत, हे विशेष! हे दगड वाढतात आणि ‘पुनरुत्पादन’ही करतात! वाढ किंवा प्रजनन हे खरे तर सजीवांचे लक्षण आहे. मात्र, या दगडांमध्येही तशी लक्षणे भासतात. या दगडांवर अनेक ‘बेबी रॉक्स’ उगवून आलेले पाहायला मिळतात. या दगडांना अर्थातच रुमानियामध्ये संरक्षण मिळालेले आहे. ट्रोवंटस् म्युझियम नॅचरल रिझर्व्हकडून हे दगड संरक्षित करण्यात आले आहेत. मध्य रुमानियामधील दुर्मीळ भूगर्भीय आणि खनिज स्थिती अशा दगडांना कारणीभूत ठरते. काही अंशी तशी स्थिती रशियाच्या छोट्याशा भागात, तुर्की व अमेरिकेतही आहे. अशा दगडांचा गाभा कठीण असतो, तर त्याभोवती वालुकाश्माचे कवच असते. हे ट्रोवंटस् दर एक हजार वर्षांमध्ये पाच सेंटिमीटरने वाढतात. अर्थात, त्यांच्या या वालुकाश्माच्या आवरणावर आणखी स्तर चढतात. दगडाचे चूर्ण आणि चुनखडीच्या मिश्रणातून हे आवरण बनत जाते. हे कवच पावसाच्या पाण्यातून कॅल्शियम कार्बोनेटसारखी खनिजे शोषून घेतात. त्यानंतर हे कवच एखाद्या सिमेंट मिक्श्चरसारखे काम करते. त्यामध्ये पाण्याशी खनिजांची क्रिया केली जाते आणि त्यामधून दगडावर थर जमा होतो. हे दगड मऊ आणि फुगीर असतात. त्यांच्यावर हजारो वर्षांच्या काळात छोटे छोटे दगड निर्माण होतात, जे नंतर फुटून वेगळे होऊन स्वतंत्रपणे वाढूही लागतात. 50 लाख वर्षांपूर्वीच्या भूकंपांमधून असे सुरुवातीचे ट्रोवंटस् अस्तित्वात आल्याचे संशोधकांना वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT