लंडन : एका नवीन अभ्यासानुसार, इ.स. 536 ते 547 या काळात झालेल्या तीन मोठ्या ज्वालामुखी उद्रेकांनी पृथ्वीच्या वातावरणात इतकी राख उडाली की, सूर्यप्रकाश कमी झाला आणि पृथ्वीचे तापमान काही अंशांनी घटले. हे हवामान बदल इतके तीव्र होते की, त्याने रोमन साम्राज्याच्या आधीच अस्थिर झालेल्या व्यवस्थेवर शेवटचा घाव घातला असावा, असा नवा दावा करण्यात आला आहे.
या ‘लघू हिमयुगाची’ पुष्टी आईसलँडमधून सापडलेल्या पुराव्यांद्वारे झाली आहे. ग्रीनलँडहून वाहत आलेल्या हिमनगांनी आईसलँडच्या पश्चिम किनार्यावर आणलेले खडक अभ्यासून, संशोधकांनी हवामानातील दीर्घकालीन गारठ्याचे संकेत शोधले आहेत. ‘जर्नल ऑफ जिऑलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, या हवामान बदलांनी पश्चिम रोमन साम्राज्याच्या अंतिम पतनात महत्त्वाची भूमिका बजावली असावी.
रोमन साम्राज्याचा नेमका अंत कधी झाला, यावर इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींनी इ.स. 410 मधील विशिगॉथ्सकडून रोमची लूट ही घटना अंतिम समजली, तर काहींनी इ.स. 476 मध्ये रोम्युलस ऑगस्टुलस याच्या पदत्यागाला शेवट मानले. मात्र, या काळात निर्माण झालेल्या हवामानातील गारठ्यामुळे शेती अपयशी ठरली, दुष्काळ निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतराला चालना मिळाली, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि क्वीन्स विद्यापीठाचे टेक्टोनोकेमिस्ट्री विभागाचे सहयोगी प्राध्यापक क्रिस्टोफर स्पेन्सर यांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘या काळातील हवामान आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण बदल विशेषतः पीक उत्पादनावर परिणाम करणार्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडवून आणू शकले. यामुळे आधीपासून अस्तित्वात असलेल्या सामाजिक तणावांमध्ये भर पडली आणि अखेरीस साम्राज्याच्या संपूर्ण विसर्जनास कारणीभूत ठरली. ‘रोमन साम्राज्याच्या पतनाची कारणे अनेक आणि गुंतागुंतीची आहेत... आर्थिक संकट, शासनातील भ—ष्टाचार, महामारी, गृहयुद्ध, आक्रमणे आणि 1984 मध्ये जर्मन इतिहासकार अलेक्झांडर डेमांड्ट यांनी तर विनोदी शैलीत साम्राज्याच्या पतनाची 210 कारणांची यादीच तयार केली होती!