Youngest mother in the world | 5 वर्षांची चिमुकली बनली होती माता 
विश्वसंचार

Youngest mother in the world | 5 वर्षांची चिमुकली बनली होती माता

85 वर्षांनंतरही पित्याची ओळख गुलदस्त्यात!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : 1939 मध्ये पेरूची लीना मार्सेला मेदिना हिने केवळ 5 वर्षांच्या वयात एका मुलाला जन्म देऊन संपूर्ण जगाला चकित केले होते. 85 वर्षांनंतरही तिला गर्भवती करणारी व्यक्ती कोण होती, याबाबतचे रहस्य आजही कायम आहे. इतक्या लहान वयात लीनाचा लैंगिक विकास कसा झाला, याबद्दल वैज्ञानिक आजही आश्चर्य व्यक्त करतात.

लीनाचा परिवार अत्यंत गरीब होता. जेव्हा लीनाचे पोट वाढू लागले, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी याला पोटातला सैतान मानून मांत्रिकांकडून उपचार घेतले. मात्र, जेव्हा तिचे वडील तिला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांना समजले की, लीना सात महिन्यांची गर्भवती आहे. जन्म: 14 मे 1939 रोजी, केवळ 5 वर्षांच्या वयात लीनाने सी-सेक्शनद्वारे एका मुलाला जन्म दिला. मुलाचे वजन सुमारे 2.7 किलोग्रॅम होते आणि त्याला कोणताही त्रास झाला नाही. वैद्यकीय तपासणीतून असे दिसून आले की, लीनाला असामान्यपणे लवकर यौवन प्राप्त झाले होते, त्यामुळे ती इतक्या लहान वयात गर्भधारणा करण्यास सक्षम झाली.

लीनाची कहाणी वैद्यकीय चमत्कार असली, तरी तिला गर्भवती करणारा कोण होता, हा प्रश्न आजही सामाजिक न्यायासाठी एक आव्हान आहे. सुरुवातीला, लीनाच्या वडिलांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते; परंतु चौकशीत लैंगिक शोषणाचे कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार न मिळाल्याने त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर लीनाचा काका आणि मानसिक आजारी असलेला भाऊ देखील चौकशीच्या कक्षेत आले. तसेच, लीनाची गर्भधारणा जाहीर झाल्यावर रहस्यमयपणे गायब झालेल्या माळी काम करणार्‍या व्यक्तीवरही पोलिसांना संशय होता. आज 85 वर्षांनंतरही या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला औपचारिकपणे दोषी ठरवले गेलेले नाही आणि पित्याची ओळख आजतागायत एक न सुटलेले रहस्य राहिली आहे.

लीनाने आपल्या मुलाला घरी वाढवले; मात्र त्याला हेच सांगण्यात आले की, ती त्याची मोठी बहीण आहे. 10 वर्षांचा झाल्यावर त्याला सत्य सांगण्यात आले. लीनाच्या मुलाचे नाव गेरार्डो ठेवले होते, ज्या डॉक्टरांनी तिला प्रसूतीसाठी मदत केली, त्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले.1979 मध्ये, वयाच्या 40 व्या वर्षी अस्थि मज्जा रोगाने गेरार्डोचे निधन झाले. लीना मेदिना आजही जिवंत आहेत की नाही, याची माहिती उपलब्ध नाही; पण जर ती जिवंत असेल तर तिचे वय 92 वर्षे असेल. त्यांची ही कहाणी वैद्यकीय विज्ञानासाठी एक आश्चर्य आणि सामाजिक न्यायासाठी एक अनुत्तरित प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT