Life after asteroid impact | लघुग्रहाच्या विनाशकारी धडकेनंतर पृथ्वीवर वेगाने परतले जीवन 
विश्वसंचार

Life after asteroid impact | लघुग्रहाच्या विनाशकारी धडकेनंतर पृथ्वीवर वेगाने परतले जीवन

शास्त्रज्ञांचा खळबळजनक खुलासा!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहाची धडक झाली आणि या विनाशकारी धडकेने डायनासोरसह 75 टक्के सजीव सृष्टी नष्ट केली. मात्र, या प्रलंयकारी घटनेनंतर पृथ्वीवर नवीन जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागली असावीत, हा शास्त्रज्ञांचा जुना समज आता खोटा ठरला आहे. नव्या संशोधनानुसार, या विनाशकारी घटनेनंतर अवघ्या 2,000 वर्षांच्या आत समुद्रात सूक्ष्म जीवांच्या (Plankton) नवीन प्रजाती जन्माला आल्या होत्या.

‘जिओलॉजी’ या नियतकालिकात 21 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालानुसार, मेक्सिकोच्या युकातान द्वीपकल्पाजवळ धडकलेल्या त्या 12 किलोमीटर रुंद ‘चिक्सुलब’ लघुग्रह धडकेनंतर जीवसृष्टीचा पुनर्जन्म अत्यंत वेगाने झाला. पूर्वी असा अंदाज होता की, नवीन प्रजाती निर्माण होण्यासाठी किमान 30,000 वर्षे लागली असतील. मात्र, नव्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, ही प्रक्रिया केवळ 2,000 ते 6,400 वर्षांतच पूर्ण झाली. उल्कापातानंतर उडालेली धूळ आणि राखेमुळे सुमारे 10 वर्षे पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचला नव्हता. अशा कठीण परिस्थितीतही निसर्गाने स्वतःला सावरण्यास सुरुवात केली होती.

यापूर्वी शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाशी साचणार्‍या गाळाच्या थरांवरून काळाचा अंदाज लावत असत. मात्र, उल्कापातानंतर हा गाळ साचण्याचा वेग सर्वत्र सारखा नव्हता. त्यामुळे संशोधकांनी ‘हेलियम-3’ या आयसोटोपचा वापर केला. हेलियम-3 हे अवकाशातील धुळीसोबत पृथ्वीवर सतत एका विशिष्ट वेगाने पडत असते. याच्या मोजमापावरून शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले की, गाळाचा एखादा थर साचायला नेमका किती वेळ लागला. या तंत्रज्ञानामुळे असे दिसून आले की, Parvularugoglobigerina eugubina सारख्या नवीन प्लँक्टन प्रजाती उल्कापातानंतर अवघ्या 6,400 वर्षांच्या सरासरीने सर्वत्र दिसू लागल्या होत्या.

काही ठिकाणी तर हा काळ 2,000 वर्षांपेक्षाही कमी होता. टेक्सास युनिव्हर्सिटीचे पेलिओशिनोग्राफर ख्रिस लोवरी म्हणतात, ‘हा वेग खरोखरच थक्क करणारा आहे. या संशोधनामुळे आपल्याला हे समजते की, एखाद्या महाविनाशानंतर पर्यावरण स्वतःला किती वेगाने सावरू शकते आणि नवीन प्रजातींची उत्क्रांती किती लवकर होऊ शकते. अहवालानुसार, सुमारे 11,000 वर्षांच्या कालावधीत प्लँक्टनच्या 10 ते 20 नवीन प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात आल्या होत्या, जे नैसर्गिक पुनरुत्थानाचे एक उत्तम उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT