Library Book Returned | १५० वर्षांनंतर लायब्ररीत परत आले पुस्तक! 
विश्वसंचार

Library Book Returned | १५० वर्षांनंतर लायब्ररीत परत आले पुस्तक!

पुढारी वृत्तसेवा

कॅनबेरा : पुस्तके माणसाला ज्ञान आणि इतिहासाशी जोडण्याचे काम करतात; पण ऑस्ट्रेलियातील एका पुस्तकाने स्वतःचीच एक अनोखी गोष्ट तयार केली आहे. सुमारे १५० वर्षे गायब राहिल्यानंतर अखेर एक जुने पुस्तक आपल्या मूळ ग्रंथालयात परत पोहोचले आहे. या पुस्तकाच्या पुनरागमनाने ग्रंथालय कर्मचारीही अवाक्‌ झाले आहेत; कारण त्यांनी इतके जुने पुस्तक परत आल्याचे कधीच पाहिले नव्हते.

हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील किनारपट्टीवर वसलेल्या कियामा शहराचे आहे. येथील कियामा लायब्ररीत १८५८ मध्ये प्रकाशित झालेले ‘अँटिक्विटीज ऑफ अथेन्स’ हे पुस्तक परत जमा करण्यात आले आहे. एका व्यक्तीला आपल्या घराची दुरुस्ती करताना हे पुस्तक सापडले आणि त्याने ते सुरक्षितपणे लायब्ररीपर्यंत पोहोचवले. ‘द असोसिएटेड प्रेस’च्या वृत्तानुसार, हे पुस्तक एका बंद पडलेल्या शेकोटीच्या (Fireplace) आत ठेवलेले आढळले. घराच्या नूतनीकरणादरम्यान जेव्हा तो भाग उघडला गेला, तेव्हा आत चहाच्या एका पेटीत हे जुने पुस्तक सुरक्षित ठेवलेले दिसले. पुस्तकाची स्थिती पाहून ते कित्येक दशकांपासून तिथेच पडून असावे, असा अंदाज लावला जात आहे.

काळाच्या ओघात पुस्तकाचे काही भाग खराब झाले असून, त्यावर पाण्याचे डागही दिसत आहेत. पुस्तकाची पाहणी केली असता ते कियामा लायब्ररीतून नेले असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर ते लायब्ररीत परत करण्यात आले. या पुस्तकाबाबतची सर्वात खास गोष्ट म्हणजे, याचे विलंब शुल्क. लायब्ररी मॅनेजर मिशेल हडसन यांनी सांगितले की, जर आजच्या हिशेबाने या पुस्तकावर दंड आकारला असता, तर त्याची रक्कम सुमारे २८ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास १८.७ लाख रुपये झाली असती. हा दंड लायब्ररीच्या जुन्या नियमांच्या आधारे काढण्यात आला आहे. त्या काळात पुस्तक वेळेत न परत केल्यास दर आठवड्याला तीन पेन्स शुल्क आकारले जायचे.

लायब्ररीच्या सुरुवातीच्या नियमांनुसार ही रक्कम हळूहळू वाढून एवढी मोठी झाली. मिशेल हडसन म्हणाल्या की, त्यांनी सोशल मीडियावर ३० किंवा ४० वर्षे जुनी पुस्तके परत आल्याच्या अनेक कथा पाहिल्या आहेत; परंतु १५० वर्षे जुने पुस्तक परत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतिहासाशी जोडलेले हे पुस्तक परत तर आले; पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे की, अखेर हे पुस्तक कोण घेऊन गेले होते आणि त्यांनी ते परत का केले नाही? लायब्ररीच्या जुन्या नोंदींमध्ये याचे उत्तर मिळू शकले असते; परंतु दुर्दैवाने १८७० च्या दशकातील ते इश्यू रजिस्टर आता उपलब्ध नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT