library book returned after 46 years | तब्बल 46 वर्षांनंतर लायब्ररीत परतले पुस्तक 
विश्वसंचार

library book returned after 46 years | तब्बल 46 वर्षांनंतर लायब्ररीत परतले पुस्तक

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डियागो काऊंटी लायब्ररीच्या ‘ला मेसा’ शाखेत जानेवारीच्या सुरुवातीला एक थक्क करणारी घटना घडली. लायब्ररीतील एका कर्मचार्‍याने जेव्हा टपालाने आलेले एक पाकीट उघडले, तेव्हा त्यातील पुस्तक पाहून सर्वजण चकित झाले. हे पुस्तक साधेसुधे नव्हते, तर तब्बल 46 वर्षांपूर्वी लायब्ररीतून नेलेले पुस्तक होते, जे आता परत आले होते.

परत आलेले हे पुस्तक शीला बर्नफोर्ड यांची प्रसिद्ध रचना ‘द इनक्रेडिबल जर्नी’ हे होते. विशेष म्हणजे, ही लायब्ररी शाखा आता तिच्या जुन्या पत्त्यावरून नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली आहे. परंतु, पुस्तक पाठवणार्‍या व्यक्तीने पूर्ण संशोधन करून ते अचूक नवीन पत्त्यावर पाठवले होते. ला मेसा शाखेच्या व्यवस्थापक कॅसी कोल्डविन यांनी सांगितले की, ‘जेव्हा मी ते पाकीट उघडले, तेव्हा त्या जुन्या पुस्तकाचा विशिष्ट सुगंध आजही तसाच होता. इतकी वर्षे जुने पुस्तक हातात धरणे आणि त्याचा सुगंध अनुभवणे हा एक विलक्षण अनुभव होता.’ हे पाकीट पाठवणार्‍याने आपले नाव किंवा पत्ता कुठेही नमूद केला नव्हता. पाकिटात फक्त एक छोटी चिठ्ठी होती, ज्यावर लिहिले होते...क्षमस्व, याला खूप उशीर झाला आणि सोबत हाताने काढलेला एक छोटा ‘स्मायली फेस’ होता.

या साधेपणामुळे ही गोष्ट अधिकच खास बनली आहे. लायब्ररीचे जुने रेकॉर्ड तपासले असता असे आढळले की, हे पुस्तक 20 मे 1980 रोजी परत करणे अपेक्षित होते. म्हणजेच, हे पुस्तक तब्बल 46 वर्षांनी परत आले आहे. इतका मोठा विलंब होऊनही लायब्ररीने कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. सॅन डिएगो काऊंटी लायब्ररीने स्पष्ट केले की, आता त्यांच्याकडे दररोज वाढणारा ‘लेट फाईन’ (विलंब शुल्क) घेतला जात नाही. लायब्ररीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘पुस्तक परत करायला कधीच उशीर होत नाही, फक्त ते परत करणे महत्त्वाचे आहे.’ कॅसी कोल्डविन यांनी सांगितले की, हे पुस्तक आता वाचकांसाठी सामान्य कपाटात ठेवले जाणार नाही. त्याऐवजी, ही आठवण कायम जतन करण्यासाठी ते त्यांच्या खासगी शेल्फवर एक स्मारक म्हणून ठेवले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT