न्यूयॉर्क : जगातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे बुधवारी, 31 डिसेंबर रोजी ‘बर्कशायर हॅथवे’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून निवृत्त होत झाले. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक गुंतवणूक इतिहासातील एका महान पर्वाचा समारोप झाला. हा केवळ एका व्यक्तीच्या सक्रिय कारकिर्दीचा अंत नसून, त्या विचारसरणीचा, संयमाचा आणि शिस्तीचा सन्मान आहे ज्याने अनेक दशकांपासून जागतिक भांडवली बाजाराला नवी दिशा दिली.
सुमारे सहा दशके बर्कशायर हॅथवेची धुरा सांभाळणाऱ्या बफे यांनी हे सिद्ध केले की, गुंतवणूक म्हणजे केवळ आकडेमोड किंवा तेजी-मंदीचा खेळ नाही, तर तो चारित्र्य, संयम आणि समजुतीची परीक्षा आहे. जेव्हा बाजार गोंधळ, भीती आणि लोभाने भरलेला असायचा, तेव्हा बफे यांनी अत्यंत साधेपणाने एकच मंत्र दिला, ‘चांगली कंपनी खरेदी करा, योग्य किमतीत खरेदी करा आणि दीर्घकाळ ती स्वतःकडे ठेवा.’ हेच तत्त्वज्ञान त्यांना गर्दीपासून वेगळे ठरवते.
विशेष म्हणजे, बफे यांनी आपला वारसदार म्हणून आपल्या मुलांची निवड केली नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर 1 जानेवारी 2026 पासून कंपनीची सूत्रे बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष ग््रेाग एबेल यांच्या हातात असतील. बफे जाताना एबेल यांच्याकडे 400 अब्ज डॉलर्स (सुमारे 36 लाख कोटी रुपये) इतकी प्रचंड रोकड सोपवून जात आहेत. वॉरेन बफे यांचा उद्योजकीय प्रवास वयाच्या सहाव्या वर्षी शीतपेय विकण्यापासून सुरू झाला. कॉलेजच्या दिवसांत त्यांनी वर्तमानपत्रे विकली, फुटबॉल सामन्यांमध्ये पॉपकॉर्न विकले आणि वयाच्या 17 व्या वर्षी पिनबॉल मशिन खरेदी करून नाव्ह्याच्या दुकानांमधून नियमित उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली.
वॉरेन बफे यांनी त्यांचे ओमाहा शहर कधीच सोडले नाही. आजही ते 1958 मध्ये 31,500 डॉलर्सना खरेदी केलेल्या त्याच जुन्या घरात राहतात, ज्याची आजची किंमत 14 लाख डॉलर्स आहे. ते या घराला आपली ‘तिसरी सर्वोत्तम गुंतवणूक’ मानतात. एक रंजक बाब म्हणजे, त्यांनी बर्कशायर हॅथवे ही कंपनी केवळ त्यावेळच्या सीईओला कामावरून काढून टाकण्यासाठी विकत घेतली होती, जी पुढे जगातील सर्वात मोठी कंपनी बनली.