नवी दिल्ली : आजच्या काळात पदवी असणे हेच यशाचे गमक मानले जाते; पण कॅनडातील टुआन ले नामक तरुणाने हे खोटे ठरवले आहे. कोणत्याही बिझनेस बॅकग्राऊंडशिवाय आणि पदवीशिवाय त्याने केवळ यूट्यूबचा आधार घेत आज चक्क1.4 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 11 कोटी रुपये) उलाढाल असलेली कंपनी उभी केली आहे.
यशाचा खडतर प्रवास, सुरुवात 8,500 डॉलर्सपासून 2019 मध्ये टुआनने टोरंटो फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता; पण केवळ 4 महिन्यांत त्याने शिक्षण सोडले. त्याने स्वतःच यूट्यूबवरून व्हिडीओ एडिटिंग आणि निर्मितीचे कौशल्य आत्मसात केले. पहिल्या वर्षी स्थानिक छोट्या व्यवसायांसाठी व्हिडीओ बनवून त्याने फक्त 8,500 डॉलर्स कमावले. दुसर्या वर्षी त्याची कमाई 17,000 डॉलर्सपर्यंत पोहोचली; पण कोव्हिड-19 मुळे त्याचे बहुतेक क्लायंट सोडून गेले. तिसर्या वर्षी लॉकडाऊनमध्ये त्याची कमाई घसरून 12,350 डॉलर्सवर आली.
परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याने पुन्हा शिक्षण सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु हार न मानता टुआनने हजारो कोल्ड ई- मेल्स पाठवले आणि आपल्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. त्याची ही जिद्द कामी आली आणि तिसर्या वर्षाच्या अखेरीस त्याची कमाई थेट 1,10,000 डॉलर्सवर पोहोचली. चौथ्या वर्षी त्याने आपला पहिला कर्मचारी कामावर ठेवला.
आज त्याच्या कंपनीत 15 लोकांची टीम काम करत असून, जगातील काही मोठे ब्रँडस् त्याचे क्लायंट आहेत. पाचव्या वर्षात त्याच्या व्यवसायाने एकूण 1.4 दशलक्ष डॉलर्सची कमाई करून एक नवा इतिहास रचला आहे.“हा प्रवास सोपा नव्हता. तिसरे वर्ष खूप कठीण होते, काहीच काम करत नव्हते; पण मी टिकून राहिलो आणि त्याचे फळ मला मिळाले,” असे टुआन ले सांगतो.