Martha Ann Lillard | ज्या मशिनने आयुष्य दिले, तेच झाले निकामी 
विश्वसंचार

Martha Ann Lillard | ज्या मशिनने आयुष्य दिले, तेच झाले निकामी

७० वर्षांची झुंज संपली

पुढारी वृत्तसेवा

न्‍यूयॉर्क : अमेरिकेतील ‘आयर्न लंग' या कृत्रिम श्वसन यंत्राच्या आधारे तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ जगणाऱ्या शेवटच्या पोलिओ रुग्ण मार्था ॲन लिलार्ड यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाचे मुख्य कारण म्हणजे त्यांना जिवंत ठेवणारे १९४० च्या दशकातील हे जुने मशिन बिघडले होते आणि ते दुरुस्त करण्यासाठीचे सुटे भाग मिळणे अशक्य झाले होते.

मार्था यांना १९५३ मध्ये त्यांच्या पाचव्या वाढदिवशी पोलिओचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना श्वास घेणे अशक्य झाल्याने 'आयर्न लंग' या धातूच्या एअरटाईट टाकीसारख्या मशिनमध्ये ठेवण्यात आले, जे कृत्रिम हवेच्या दाबाने फुफ्फुसांचे आकुंचन-प्रसरण करण्यास मदत करते. अमेरिकेत १९५५ मध्ये पोलिओची लस येण्यापूर्वी या आजाराने हजारो मुलांना ग्रासले होते. मार्था यांनी आधुनिक व्हेंटिलेटर वापरून पाहिले होते; परंतु त्यांच्या शरीराला आवश्यक असलेला हवेचा दाब फक्त याच जुन्या मशिनमधून मिळत असल्याने त्यांनी आयुष्यभर याचाच वापर केला.

सुरुवातीला त्या दिवसातील २३ तास यात घालवायच्या; पण नंतर प्रकृती सुधारल्यावर फक्त रात्री झोपण्यासाठी ९ तास याचा वापर करत असत. मात्र, अलीकडच्या काळात त्यांना दोनदा कोरोना आणि नागीण (Shingles) हा आजार झाला. यामुळे त्यांची फुफ्फुसांची क्षमता अवघी २५ टक्के राहिली आणि मृत्यूआधीच्या काही महिन्यांत त्यांना २४ तास या मशिनमध्ये राहावे लागले होते. त्यातच हे जुने मशिन निकामी झाल्याने अखेर २६ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT