वॉशिंग्टन : गेल्या शंभर वर्षांतील सर्वात मोठे पूर्ण सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे. या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने जग एका मोठ्या आणि दुर्मीळ खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहे. या ग्रहणामुळे पृथ्वीच्या मोठ्या भागावर दिवसाढवळ्या अंधार पसरणार आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण तब्बल 6 मिनिटे आणि 23 सेकंद इतके प्रदीर्घ काळ चालेल. यामुळे ते जवळपास एका शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण ठरणार आहे.
यापूर्वी इतिहासातील सर्वात मोठे सूर्यग्रहण इ.स.पू. 743 मध्ये लागले होते, जे 7 मिनिटे 28 सेकंद चालले होते. सूर्यग्रहण तेव्हा होते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सरळ रेषेत येतो आणि सूर्याचा प्रकाश पूर्णपणे अडवतो. या घटनेमुळे दिवसा काही मिनिटांसाठी रात्रीसारखा अंधार होतो. 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार्या सूर्यग्रहणाचा मार्ग अटलांटिक महासागरातून सुरू होणार असून, अनेक खंडांमधून प्रवास करेल. जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून दक्षिण स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया आणि इजिप्त यांसारख्या उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये दिसेल.
इजिप्तमध्ये हे ग्रहण आकाशात सर्वोच्च बिंदूवर असताना दिसणार असल्याने तेथील द़ृश्य सर्वात खास असेल. पुढे लाल समुद्र पार करून सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया या देशांमध्ये अंधार पसरेल आणि अखेर हिंद महासागरावर ते समाप्त होईल. जगभरातील लोकांसाठी ही एक मोठी पर्वणी असली, तरी हे पूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.