Prehistoric Europe Treasure | प्रागैतिहासिक युरोपमधील सोन्याचा सर्वात मोठा खजिना  
विश्वसंचार

Prehistoric Europe Treasure | प्रागैतिहासिक युरोपमधील सोन्याचा सर्वात मोठा खजिना

जर्मनीतील ‘गेसेल गोल्ड होर्ड’चे रहस्य

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन : उत्तर जर्मनीमध्ये नैसर्गिक वायूच्या पाईपलाईनसाठी उत्खनन करत असताना कामगारांना प्रागैतिहासिक युरोपमधील सोन्याचा एक सर्वात मोठा खजिना सापडला आहे. ‘गेसेल गोल्ड होर्ड’ म्हणून ओळखला जाणारा हा खजिना साधारणपणे इसवी सन पूर्व १३०० मधील (सुमारे ३,३०० वर्षांपूर्वीचा) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या खजिन्यात एकूण ११७ सोन्याच्या वस्तू सापडल्या असून, त्यांचे एकूण वजन १.७ किलोग्रॅम (सुमारे ३.७ पाैंड) पेक्षा जास्त आहे.

हा ऐतिहासिक खजिना ‘सायके’ शहराजवळील ‘गेसेल’ या गावात सापडला. सध्या हा खजिना ‘फोरम गेसेलर गोल्डहॉर्ट’ संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, सुमारे ३,३०० वर्षांपूर्वी एका व्यक्तीने या सर्व सोन्याच्या वस्तू एका सुती (लिनन) पिशवीत ठेवल्या, ती पिशवी ब्रॉन्झच्या सहा पिनांनी सुरक्षित केली आणि जमिनीत गाडून टाकली. मात्र, हे सोने नेमके कोणत्या कारणासाठी पुरून ठेवले होते, याचे गूढ अद्याप उकललेले नाही.

या खजिन्यामध्ये पुढील महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे : ८२ स्पायरल रिंग्ज (गोलाकार कड्या) : या कड्या १० कड्यांच्या ८ साखळ्यांमध्ये आणि २ कड्यांच्या १ साखळीमध्ये एकमेकांत अडकवलेल्या आहेत. ३२ वेगवेगळ्या आकाराचे स्पायरल : संशोधकांच्या मते हे कोणतेही दागिने नसून, मध्य कांस्ययुगातील व्यवहाराचे एक ‘चलन’ असण्याची दाट शक्यता आहे. प्रागैतिहासिक पुरातत्त्वशास्त्रज्ञ बाबेट लुडोविची यांच्या मते, हे चलन पुनर्वापर केलेल्या सोन्यापासून बनवले गेले होते. वैयक्तिक दागिने : या संपूर्ण खजिन्यात वैयक्तिक वापराचे अवघे ३ दागिने होते. यामध्ये सोन्याचे एक मोठे ब्रेसलेट, एक पिरगाळलेली हातातील पट्टी आणि एका ब्रुचचा समावेश आहे.

दोन्ही आर्मबँड अर्धवट बनवलेले वाटतात, तर ब्रुच अतिशय सुंदर नक्षीकामाने सजवलेला आहे. या खजिन्यात सापडलेला ब्रुच सुरुवातीला सुमारे १६ सेंटीमीटर (६.३ इंच) लांब होता. परंतु, तो जमिनीत पुरण्यापूर्वी मुद्दाम वाकवला गेला होता आणि त्याची पिन काढून टाकण्यात आली होती. या ब्रुचवर कारागिराने शिडीसारखी नक्षी कोरली आहे. तसेच, त्यावर सूर्याची पाच चिन्हे आणि एकाग्र वर्तुळांचे सहा संच धातूवर कोरलेले आहेत. २०१२ च्या एका अभ्यासानुसार, मध्य युरोपमध्ये सापडलेला हा एकमेव ठोस सोन्याचा प्राचीन ब्रुच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT