लंडन : पृथ्वीच्या गर्भात सापडणार्या इतर हिर्यांप्रमाणे हा हिरा साधारण नाही. हा आहे ‘द एनिग्मा’. तब्बल 555.55 कॅरेटचा, जगातील सर्वात मोठा काळा हिरा. या हिर्याचे रहस्य त्याच्या नावाप्रमाणेच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा हिरा पृथ्वीवरचा नसून, अब्जावधी वर्षांपूर्वी एका लघुग्रहाच्या पृथ्वीवर झालेल्या आघातातून तो इथे पोहोचला असावा.
‘एनिग्मा’ हा एक ‘कार्बोनॅडो’ (Carbonado) प्रकारचा हिरा आहे. कार्बोनॅडो हिरे हे सामान्य हिर्यांपेक्षा खूपच वेगळे आणि दुर्मीळ मानले जातात. ते फक्त ब्राझील आणि मध्य आफ्रिकेत आढळतात. त्यांची रचना अत्यंत कठीण असून, त्यात ऑस्बोर्नाइट (Osbornite) नावाचे एक दुर्मीळ खनिज आढळते, जे सामान्यतः उल्कापिंडांमध्ये सापडते. याच कारणामुळे शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ‘एनिग्मा’ सारखे हिरे पृथ्वीवर तयार झालेले नाहीत. असा अंदाज आहे की, सुमारे 2.6 ते 3.8 अब्ज वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवर डायनासोरचेही अस्तित्व नव्हते, तेव्हा एखादा हिर्यांनी समृद्ध लघुग्रह पृथ्वीवर आदळला असावा आणि त्यातूनच या काळ्या हिर्यांची निर्मिती झाली असावी.
त्यामुळे हा हिरा म्हणजे केवळ एक मौल्यवान रत्न नसून, तो आपल्या सौरमालेच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. ‘एनिग्मा’चे वजन 555.55 कॅरेट असून त्याला अत्यंत कुशलतेने 55 पैलू पाडण्यात आले आहेत. हा आकार आणि पैलूंची संख्या मध्य-पूर्वेतील शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानल्या जाणार्या ‘हमसा’ या चिन्हावरून प्रेरित आहे. लंडन येथील प्रसिद्ध लिलावघर सोदबीज (Sotheby' s) मध्ये झालेल्या लिलावात या हिर्याला तब्बल 3.16 दशलक्ष पौंड (अंदाजे 32 कोटी रुपये) इतकी किंमत मिळाली. या हिर्याच्या गूढ उगमामुळे आणि त्याच्या अद्वितीय रचनेमुळे जगभरातील संग्राहकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता होती.