Kurmagram village | नको एआय.. नको ‘५ जी’..! 
विश्वसंचार

Kurmagram village | नको एआय.. नको ‘५ जी’..!

‘हे’ गाव आजही जगतेय १०० वर्षांपूर्वीचे आयुष्य

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : जेव्हा संपूर्ण जग ५जी इंटरनेट, स्मार्टफोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मागे धावत आहे, अशा काळात आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील एंथकापल्ली टेकड्यांच्या शांत परिसरामध्ये वसलेले एक छोटेसे गाव संपूर्ण देशाचेच नव्‍हे तर जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ‘कुर्मा ग्रामम’ असे नाव असलेल्या या गावात तब्बल १७ कुटुंबे कोणत्याही आधुनिक सुविधेविना पूर्णपणे स्वेच्छेने आणि आनंदात आपले आयुष्य जगत आहेत.

सुमारे ६० एकरांवर पसरलेल्या या गावात न वीज आहे, न मोबाईल फोन, न टीव्ही, ना गॅस सिलिंडर. येथील नागरिक शतकांमागील निसर्गपूरक जीवनपद्धतीचा अवलंब करत आहेत. येथील घरे सिमेंट किंवा लोखंडाऐवजी माती, चुना, लाकूड आणि दगडांचा वापर करून बांधलेली आहेत. घराचे मजले शेणाने सारवले जातात. रात्रीच्या वेळी विजेच्या दिव्यांऐवजी एरंडेल तेलाचे पणत्‍या, दिवे वापरले जातात.पारंपरिक स्वयंपाक आणि दिनचर्या अन्नासाठी गॅस सिलिंडरऐवजी मातीच्या चुलींवर लाकूड जाळून स्वयंपाक केला जातो.

आंघोळ आणि स्वच्छतेसाठी साबणाऐवजी ‘रीठा’ आणि नैसर्गिक घटकांचा वापर होतो. ब्राह्म मुहूर्तावर पहाटे ३.३० वाजता संपूर्ण गाव जागे होते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन दिव्यांच्या मंद प्रकाशात भजन, कीर्तन आणि ध्यान करतात. मुलांसाठी कॉन्व्हेंट किंवा आधुनिक शाळांऐवजी ‘गुरुकुल’ चालवले जाते. येथे मुलांना वेद, रामायण आणि भगवद्‌गीता यांसोबतच मूलभूत गणित आणि इंग्रजीचे धडे दिले जातात. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश माणसाला निसर्गाच्या कुशीत परत आणणे आणि तणावमुक्त जीवनशैली प्रदान करणे हा आहे. कोणतीही आधुनिक संसाधने नसतानाही येथील लोक अत्यंत समाधानी आयुष्य जगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT