जयपूर ः चीनमधील भिंतीचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये होत असतो. मात्र, आपल्या देशातही लांबलचक भिंत पाहायला मिळते. भारतात ऐतिहासिक स्थळांची कमतरता नाही. आपल्या देशात अनेक राजवाडे आणि किल्ले आहेत, जे पाहण्यासारखे आहेत. इतिहासाची आवड असलेल्यांनी आवर्जून अशा ठिकाणांना भेट द्यायला हवी. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्येही अनेक डोंगरी किल्ले आहेत, त्यापैकी एक कुंभलगड किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या किल्ल्याची तटबंदीची भिंत ही देशातील सर्वात लांब भिंत आहे.
राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात असलेला हा किल्ला अजयगड या टोपणनावानेही ओळखला जात असे, कारण हा किल्ला जिंकणे कोणत्याही राजासाठी खूप अवघड काम होते. हा किल्ला अरवली पर्वतरांगांवर वसलेला असून, समुद्रसपाटीपासून 1,100 मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याची तटबंदीची भिंत तब्बल 36 किलोमीटर लांबीची आहे. ही भिंत 15 फूट रुंद आहे. हा किल्ला महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान आहे.
किल्ल्याच्या परिसरात अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. या किल्ल्याच्या भिंतीला ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ असेही म्हणतात. या तटबंदीला आणि किल्ल्याला भेट देण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून पर्यटक येतात. द ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर या किल्ल्याची भिंत पाहण्यासारखी आहे. हा किल्ला 15 व्या शतकातील आहे. अकबरालाही हा किल्ला नष्ट करता आला नाही. या किल्ल्यात तुम्ही लाईट आणि साऊंड शो देखील पाहू शकता.