Korowai Tribe | 50 मीटर उंच झाडांवर घरे बांधून राहणारा ‘कोरोवाई’ समुदाय 
विश्वसंचार

Korowai Tribe | 50 मीटर उंच झाडांवर घरे बांधून राहणारा ‘कोरोवाई’ समुदाय

पुढारी वृत्तसेवा

जकार्ता : आधुनिक तंत्रज्ञान आणि धावपळीच्या जगापासून हजारो मैल दूर, इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतातील घनदाट जंगलात एक असा आदिवासी समुदाय राहतो, ज्यांचे जीवन आजही हजारो वर्षांपूर्वीसारखेच आहे. हा आहे ‘कोरोवाई’ समुदाय. जमिनीवर न राहता चक्क 10 ते 50 मीटर उंचीवर झाडांवर घरे बांधून राहण्याची त्यांची पद्धत संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.

कोरोवाई किंवा ‘कोलुफो’ जमातीची लोकसंख्या जेमतेम 4,000 ते 4,400 इतकी आहे. त्यांच्या जीवनशैलीची काही खास वैशिष्ट्ये : झाडांवरील घरे : जंगली श्वापदे आणि शत्रू टोळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे लोक उंच झाडांच्या फांद्यांवर आपली घरे बांधतात. दैनंदिन जीवन : झाडांवर चढणे, तिथेच स्वयंपाक करणे आणि झोपणे ही त्यांच्यासाठी सामान्य गोष्ट आहे. अन्न : शिकार करणे, मासेमारी आणि जंगलातील कंदमुळे किंवा फळे गोळा करून ते आपली उपजीविका करतात. 1970 च्या दशकापर्यंत या जमातीबद्दल बाह्य जगाला काहीही माहिती नव्हती. वीज, रस्ते किंवा बाजारपेठ यांपैकी कशाचाही त्यांच्या आयुष्यात शिरकाव झाला नव्हता.

काही संशोधकांच्या मते, 55,000 वर्षांहून अधिक काळ ही जमात जगापासून तुटलेली होती आणि त्यांना वाटायचे की पृथ्वीवर ते एकमेव मानव आहेत. अलीकडच्या वर्षांत काही पर्यटक, मिशनरी आणि संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. ‘First Contact' आणि ‘Human Planet’ सारख्या डॉक्युमेंटरीजमधून त्यांच्या जीवनाची झलक जगासमोर आली आहे. बाह्य जगाशी संपर्क आल्यानंतरही या जमातीने आपली भाषा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपले आहे. ‘कोरोवाई जमात हे उत्तम उदाहरण आहे की, माणूस निसर्गाशी ताळमेळ राखून किती सुंदररीतीने जीवन जगू शकतो,’ असे संशोधक म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT