knee pain without surgery | गुडघेदुखीवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार? Pudhari File Photo
विश्वसंचार

knee pain without surgery | गुडघेदुखीवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार?

शास्त्रज्ञांनी शोधले कार्टिलेजवर नवे औषध!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आजच्या धावपळीच्या युगात वयाची चाळीशी ओलांडताच अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. विशेषतः पायर्‍या चढताना किंवा उतरताना होणार्‍या वेदनांमुळे अनेकजण हैराण असतात. याचे मुख्य कारण म्हणजे गुडघ्यातील ‘कार्टिलेज’ घासले जाणे किंवा खराब होणे. आतापर्यंत यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जात होता; परंतु स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका अशा औषधाचा शोध लावला आहे जे शरीरातील कार्टिलेज पुन्हा नैसर्गिकरित्या वाढवू शकते.

आपल्या गुडघ्यांच्या सांध्यामध्ये हाडांच्या टोकावर एक मऊ आणि गुळगुळीत उती (टिशू) असते, ज्याला ‘कार्टिलेज’ म्हणतात. हे एका कुशनप्रमाणे काम करते, ज्यामुळे सांध्यांची हालचाल सुलभ होते. वाढत्या वयानुसार हे कार्टिलेज हळूहळू पातळ होते किंवा झिजते. शरीरात हे कार्टिलेज स्वतःहून दुरुस्त होण्याची क्षमता नसते, त्यामुळे हाडे एकमेकांना घासली जाऊन तीव्र वेदना होतात. स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी एका नवीन औषधावर काम केले आहे जे शरीरातील ‘15- PGDH’ नावाच्या प्रोटीनला रोखण्याचे काम करते. हे औषध शरीरातील ‘Prostaglandin E2’ नावाच्या घटकाची पातळी राखण्यास मदत करते.

हा घटक कार्टिलेजला निरोगी ठेवण्यासाठी आणि ते पुन्हा तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला उंदरांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. यामध्ये उंदरांच्या गुडघ्यातील कार्टिलेज केवळ वाचलेच नाही, तर ते पुन्हा वाढू लागले. त्यामुळे त्यांच्या सांध्यांची हालचाल सुलभ झाली. संशोधकांनी ज्या रुग्णांना ‘जॉईंट रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता, त्यांच्यावर हे प्रयोग केले. केवळ एका आठवड्याच्या उपचारानंतर रुग्णांच्या उतींमध्ये नवीन कार्टिलेज तयार होण्याची चिन्हे दिसली आणि त्यांचे नुकसानही कमी झाले. जरी हे औषध सध्या सर्वसामान्य रुग्णांसाठी बाजारपेठेत उपलब्ध नसले, तरी या संशोधनाने संधिवात आणि सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी मोठा आशेचा किरण दाखवला आहे. जर ही औषधी चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, तर भविष्यात लाखो लोकांना गुडघ्याच्या मोठ्या शस्त्रक्रियांपासून सुटका मिळू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT