वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआय आता लवकरच आपल्याला आपल्या किचनमध्ये एखाद्या निष्णात शेफसारखा विचार करताना आणि आपल्याला निरनिराळी चविष्ट व्यंजने तयार करून देताना दिसून येणार आहे. आयआयटी दिल्लीच्या एका पीएच.डी. संशोधकाने एआय संचलित उपकरण तयार केले असून, त्याला ‘रैटटौईल’ असे नाव दिले आहे. हा रैटटौईल रोबो 74 देशांमधील चक्क 1 लाख 18 हून अधिक व्यंजने तयार करण्यात आपली कमालीची मदत करू शकतो, असा या संशोधकांचा दावा आहे.
प्रा. गणेश बगलर व इन्फोसिस सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची पीएच.डी. संशोधक मानसी गोयल यांनी असा दावा केला आहे की, रोबोसारखे हे उपकरण एखाद्या शेफसारखा विचार करण्यासाठीच साकारले गेले आहे. आश्चर्य म्हणजे हे उपकरण विकसित करण्यासाठी तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे. यातील आठ वर्षे, तर फक्त कोडिंगवरच संशोधन केले गेले आहे.
जगभरातील वेगवेगळी व्यंजने, त्यांचा डाटा एकत्रित करण्यात आला आणि त्यानंतर जगभरातील नावाजले गेलेल्या शेफची मते यात अंतर्भूत करण्यात आली. त्यानंतर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोडिंगच्या माध्यमातून एल्गोरिदम तयार करण्यात आले आहे. या रोबोच्या माध्यमातून आता आपण कोणती व्यंजने तयार करू शकतो, हेदेखील सूचवले जाते आणि ती व्यंजने तयार करण्यासाठी हा रोबो कमालीची मदतदेखील करतो. विविध देशांतील नागरिकांना नेमके काय खाण्यास आवडते, यावरदेखील यात भर देण्यात आला आहे. घरात जी सामग्री आहे, त्याची यादी दिली, तरी हा रोबो आपल्याला त्यापासून कोणती डिश तयार करता येऊ शकते, याची यादी देण्यासाठी सक्षम आहे.
शेफ मॅजिक हादेखील एक किचन रोबोट जवळपास 200 हून अधिक रेसिपी तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले गेले आहे. या रोबोमध्ये 200 पेक्षा अधिक रेसिपी अपलोड केली गेली आहेत. भारतीय डिशेसपासून अगदी व्हेगन, काँटिंनेंटल, थाय, मेक्सिकन, चायनीज, इटालियन डिशेसपर्यंतच्या रेसिपीचा यात समावेश आहे. डायबेटिस, बीपीसारखे विकार असतील, तर अशावेळी कोणत्या डिशेसना प्राधान्य द्यावे, कोणती डिशेस टाळावीत, यावरदेखील टीप्स यात उपलब्ध असणार आहेत. सध्या यावर प्रायोगिक स्तरावर संशोधन सुरू असून, लवकरच ते प्रत्यक्ष किचनमध्ये उपलब्ध होऊ शकेल, असे तूर्तास सांगण्यात आले आहे.