वॉशिंग्टन : ‘किसिंग बग’ या कीटकाला अनेक लोक ट्रायटोमाइन बग म्हणूनही ओळखतात. हा कीटक मुख्यतः रात्रीच्या वेळी माणसांना आपले शिकार बनवतो. रात्रीच्या वेळी हा बग माणसाच्या जवळ येतो आणि चेहरा किंवा ओठांच्या जवळ चावतो तसेच आपले मल त्या जागेवर सोडतो. चावल्यानंतर लोकांना खाज सुटते आणि ते जागा खाजवतात. याचवेळी बगचे मल जखमेत जाऊन शरीरात प्रवेश करतात. अनेकदा डोळ्यांद्वारे किंवा तोंडावाटेही या बगचे मल शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे ‘चागास रोग’ होण्याची शक्यता वाढते. अमेरिकेत सध्या या ‘किसिंग बग’ची दहशत आहे.
हा बग सहसा चेहर्यावर हल्ला करतो, म्हणूनच याला ‘किसिंग बग’ म्हटले जाते. हे किडे काळ्या रंगाचे असतात आणि दिसायला लहान कीटकांसारखे दिसतात; पण त्यांचा परिणाम खूप मोठा आणि धोकादायक असू शकतो. ‘किसिंग बग’ म्हणजेच ट्रायटोमाइन बगच्या मलामध्ये ट्रिपॅनोसोमा क्रूझी नावाचा एक परजीवी आढळतो, जो चागास रोगासाठी जबाबदार असतो. बर्याच लोकांना हे माहीत नसते की, त्यांना ‘किसिंग बग’ने चावा घेतला आहे.
अनेकांना वाटते की हा फक्त एका सामान्य डासाच्या चावण्याचा परिणाम आहे आणि ते नकळत ती जागा खाजवतात. याच दरम्यान परजीवी शरीरात प्रवेश करतो, जो नंतर ‘चागास रोग’चे रूप घेतो. चागास रोगाची लक्षणे अनेकदा खूप सामान्य असतात, ज्यामुळे तो ओळखणे खूप कठीण होते. साधारणपणे या आजारात ताप, थकवा, अंगदुखी, त्वचेवर पुरळ, डोळ्यांच्या पापण्यांना सूज, पचनाची समस्या आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या दिसून येतात. चागास रोगाचे टप्पे :
1) पहिला टप्पा : चागास रोग दोन टप्प्यांमध्ये पसरतो. पहिल्या टप्प्यात, लक्षणे खूप सौम्य असतात किंवा काही वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हा टप्पा काही आठवडे किंवा महिने टिकतो. या काळात परजीवी रक्तात मोठ्या प्रमाणात असतो.
2) दुसरा टप्पा : अनेक लोकांना या रोगाचा दुसर्या टप्प्यातच पत्ता लागतो, जेव्हा लक्षणे गंभीर होतात. चागास रोगामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदय निकामी होणे, पचन संस्थेतील बिघाड आणि आतड्यांना सूज येण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत हा रोग लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये पसरला आहे.