जकार्ता : साप म्हटले की, अनेकांना भीती वाटते आणि जर तो जगातील सर्वात मोठा विषारी सर्प असलेला ‘किंग कोब्रा’ असेल तर भीती आणखी वाढते. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ या भीतीला बाजूला ठेवत कोब्राच्या एका अनोख्या आणि गोंडस रूपाचं दर्शन घडवतोय. या व्हिडीओत किंग कोब्रा एक छोटीशी, अस्वलासारख्या कानांनी सजलेली लोकरी टोपी घालून बसलेला आहे आणि हे द़ृश्य बघून लोक अक्षरश: फिदा झाले आहेत! खरे तर, वन्य प्राण्यांबाबत असा आचरट प्रकार करणे ही निषेधाची गोष्ट आहे; पण जगाच्या पाठीवर काही लोक असे प्रकार करून लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.
इंडोनेशियातील इन्फ्लुएंसर सहाबत आलम यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून, तो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये कोब्रा टोपीसह कॅमेर्यासमोर पोज देताना दिसतो आणि त्याच्या चेहर्यावर कोणताही रोष नाही. टोपी इतकी नीट बसलेली आहे की, ती हलतही नाही. हा माणूस कोब्राच्या शेजारी शांतपणे बसून चहा पीत आहे आणि काही क्षणांनी तो कोब्राच्या शेपटीला आणि टोपीला हलकेच स्पर्श करतो.
यावर कोब्रा थोडा गोंधळलेला आणि चिडलेला दिसतो. पण, नेटिझन्सचं लक्ष मात्र कोब्राच्या ‘क्यूटनेस’ कडे अधिक आहे. या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाइक्स आणि हजारो कमेंटस् मिळाल्या आहेत. एक युजर म्हणतो, ‘कोब्रा: मला जरा सीरियसली घ्या, मी किंग कोब्रा आहे!’ तर दुसरा म्हणतो, ‘हाहा, इतका गोंडस!’ आणि काहींनी तर त्याला ‘पुकी’ असंटोपणनावही दिलंय.