लंडन ः सर्पविश्वात असाही एक जीव आहे जो केवळ त्याच्या विषासाठीच नाही तर त्याच्या ‘स्मार्टनेस’साठीही ओळखला जातो. संशोधकांच्या मते, ‘किंग कोबा’ हा जगातील सर्वात बुद्धिमान साप आहे. तो विनाकारण हल्ला करत नाही, तर आधी परिस्थितीचा अंदाज घेतो आणि मगच आपली चाल चालतो.
जगात सापांच्या 3,000 हून अधिक प्रजाती आहेत. ‘ब्लॅक माम्बा’ किंवा ‘इनलँड ताइपन’ हे साप अत्यंत विषारी मानले जातात, परंतु बुद्धिमत्तेच्या बाबतीत किंग कोबा सर्वांना मागे टाकतो. किंग कोबा धोका दिसताच आंधळेपणाने तुटून पडत नाही. तो आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलतो. शिकार करताना तो कमालीचा संयम दाखवतो आणि योग्य वेळ आल्यावरच वार करतो. त्याची ही ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ क्षमता त्याला इतर सापांपेक्षा वेगळे ठरवते. किंग कोबाची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे तो घरटे बांधतो. जगातील तो असा एकमेव साप आहे जो आपल्या अंड्यांसाठी पालापाचोळा आणि काड्यांपासून घरटे तयार करतो. कालांतराने हे घरटे सडून त्यातून उष्णता निर्माण होते, जी अंडी उबवण्यासाठी नैसर्गिक इनक्यूबेटरचे काम करते. मादी किंग कोबा अनेक आठवडे या घरट्याचे रक्षण करते, जे तिच्या नियोजित वर्तनाचे प्रतीक आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार, किंग कोबामध्ये माणसांना ओळखण्याची क्षमता असते. त्याच्या तोंडात असलेल्या ‘जॅकोब्सन ऑर्गन’ मुळे तो गंधाद्वारे ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींमधील फरक ओळखू शकतो. म्हणूनच, पाळीव किंग कोबा त्यांच्या केअरटेकरसमोर शांत राहतात, मात्र अनोळखी व्यक्तीला पाहताच सतर्क होतात. किंग कोबा शिकारीचा आकार आणि हालचाल पाहून आपला हल्ला ठरवतो. तो अत्यंत अचूकपणे आपल्या भक्ष्यामध्ये ‘न्यूरोटॉक्सिन’ विष सोडतो आणि शिकार पूर्णपणे ताब्यात घेतो. त्याची ही अनुकूलनक्षमता त्याला सर्पविश्वाचा खरा ‘किंग’ बनवते.