King Charles: जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेसोबत किंग चार्ल्स यांचा आनंददायी संवाद Pudhari Photo
विश्वसंचार

King Charles: जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेसोबत किंग चार्ल्स यांचा आनंददायी संवाद

ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांनी नुकतीच जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, 116 वर्षीय एथेल कॅटरहॅम यांची भेट घेतली

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांनी नुकतीच जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, 116 वर्षीय एथेल कॅटरहॅम यांची भेट घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर किंग चार्ल्स यांनी सरे येथील त्यांच्या केअर होमला भेट दिली. या भेटीदरम्यान, श्रीमती कॅटरहॅम यांनी 1969 मध्ये ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ म्हणून चार्ल्स यांचा राज्याभिषेक झाल्याची आठवण सांगितली, तेव्हा सर्व मुली त्यांच्या प्रेमात होत्या आणि त्यांच्याशी लग्न करू इच्छित होत्या, असेही नमूद केले.

श्रीमती कॅटरहॅम यांनी सांगितलेल्या आठवणींनी किंग चार्ल्स यांच्या चेहर्‍यावर मोठे हास्य फुलले. त्यांनी श्रीमती कॅटरहॅम यांचा हात धरून स्वतःची ओळख करून दिली. यावेळी श्रीमती कॅटरहॅम यांनी त्यांच्या 1969 मधील राज्याभिषेकाची आठवण सांगितली. कॅटरहॅम यांच्या नातवांपैकी एक असलेल्या केट हेन्डर्सन यांनी प्रिन्स चार्ल्स खूप देखणे होते आणि सर्व मुली त्यांच्या प्रेमात होत्या. ते खरे राजकुमार होते आणि आता राजे आहेत, अशी आठवण आजींनी (हॅटरहॅम) आपल्याला नुकतीच सांगितली होती, असे यावेळी सांगितले. त्यावर विनोदी प्रतिक्रिया देत चार्ल्स म्हणाले, ‘हो, आता त्यांच्यापैकी (राजकुमार) जे काही उरले आहे, तेच मी आहे’.

एप्रिलमध्ये ब्राझीलच्या सिस्टर इनाह कॅनाबारो लुकास यांच्या निधनानंतर श्रीमती कॅटरहॅम या जगातील सर्वात जास्त वयाच्या व्यक्ती बनल्या. त्यांनी त्यांचा 116 वा वाढदिवस कुटुंबासोबत शांतपणे साजरा करण्याचे ठरवले होते, पण जर राजा आले तर त्यांना भेट देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. यानंतर काही आठवड्यांनी चार्ल्स स्वतः त्यांना भेटायला गेले.

कॅटरहॅम यांच्या दीर्घायुष्याचा प्रवास

श्रीमती कॅटरहॅम यांचा जन्म 21 ऑगस्ट, 1909 रोजी हॅम्पशायरमध्ये झाला. त्या पहिल्या महायुद्धाच्या पाच वर्षे आधी जन्मल्या होत्या आणि 1910 मध्ये निधन पावलेल्या किंग एडवर्ड सातवे यांच्या शेवटच्या जीवित प्रजेपैकी आहेत. 18 व्या वर्षी त्या भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका सैनिकी कुटुंबासोबत राहून देखभालीचे काम केले.

1931 मध्ये त्यांची लेफ्टनंट कर्नल नॉर्मन यांच्यासोबत भेट झाली आणि 1976 मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत त्यांनी त्यांचा संसार सांभाळला. त्यांना दोन मुली होत्या, ज्या दोघींचेही त्यांच्या आधी निधन झाले. त्यांनी वयाच्या 97 व्या वर्षापर्यंत गाडी चालवली आणि 100 वर्षांनंतरही त्या ब्रिज हा पत्त्यांचा खेळ खेळत होत्या. 2020 मध्ये, वयाच्या 110 व्या वर्षी, त्यांनी कोव्हिड-19 वर यशस्वी मात केली. जगातील सर्वात जास्त काळ जगलेल्या व्यक्तीचा विक्रम अजूनही फ्रेंच महिला जेन्ने कॅलमेंट यांच्या नावावर आहे, ज्या 122 वर्षे 164 दिवस जगल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT