ओस्लो : नॉर्वेमधील शास्त्रज्ञांनी जंगलात एका ‘ओर्का’ (Orcinus orca - किलर व्हेल) पिल्लाचा जन्म पाहिला असून, त्याचे प्रथमच फोटो आणि फुटेज कॅमेर्यात कैद करण्यात आले आहेत. संशोधक आर्क्टिक सर्कलमध्ये असलेल्या स्केर्व्हॉय किनार्याजवळ व्हेल-वॉचिंग ट्रिपदरम्यान ओर्कांच्या एका समूहाचे निरीक्षण करत होते. त्यावेळी ही घटना दिसली, असे त्यांनी सांगितले.
नॉर्वेच्या पाण्यात सागरी सस्तन प्राण्यांची माहिती गोळा करणार्या ‘ओर्का चॅनल’ या बोट टूर कंपनीच्या छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर क्रिस्झटिना बालोते यांनी 2 नोव्हेंबर रोजी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले : ‘आम्ही शांतपणे तरंगत होतो आणि त्यांचे खाद्य शोधणे पाहत होतो, तेव्हा अचानक बोटीजवळ सर्वत्र रक्त सांडले आणि उडू लागले. सुरुवातीला मला काय चालले आहे, याची कल्पना नव्हती. थोड्या वेळाने, मला एक छोटे डोके पाण्यावर दिसले. तेव्हा लक्षात आले की, एका मादीने अगदी आमच्या शेजारी बाळाला जन्म दिला होता.
‘पिल्लाचा जन्म झाल्यावर, उर्वरित समूहाने लगेच त्याच्याभोवती संरक्षणात्मक वर्तुळ तयार केले. समूहातील ओर्का, ज्यात बहुतेक मादी आणि लहान ओर्का होते, ते असामान्यपणे उत्साही दिसत होते आणि नवजात पिल्लाला बळजबरीने पृष्ठभागाकडे ढकलत होते. यामुळे बोटीवरील टीमला सुरुवातीला चिंता वाटली. बालेते यांनी लिहिले : ‘आम्ही पाहिले की ते पिल्लाला त्यांच्या पाठीवर घेऊन हवेसाठी पाण्यावर धरून होते. ते जिवंत आहे की नाही, याबद्दल मला खात्री नव्हती.’ ‘नॉर्वेजियन ओर्का सर्व्हे’ या संशोधन आणि संवर्धन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जवळून पाहण्यासाठी ओर्कांवर ड्रोन उडवला.
त्यांनी जवळच्या इतर पाच व्हेल-वॉचिंग बोटींना परिसर रिकामा करण्यास सांगितले, जेणेकरून प्राणी शांत होऊ शकतील. ड्रोनच्या फुटेजमधून दिसून आले की, जन्मानंतर पहिली 15 मिनिटे पिल्लाला पाण्यावर तरंगण्यासाठी संघर्ष करावा लागला; पण त्यानंतर ते जिवंत आणि सुरक्षित होते. संस्थेच्या प्रतिनिधींनी लिहिले : ‘आईची ओळख NKW-591 अशी पटली आहे, ही 2009 पासून ओळखली जाणारी मादी आहे. तिला अनेक पिल्ले झाली आहेत, त्यामुळे ती अनुभवी आई आहे.’