AI friends: पालक फोनमध्ये व्यस्त, म्हणून मुलांनी ‌‘एआय‌’ला बनवले मित्र! Pudhari
विश्वसंचार

AI friends: पालक फोनमध्ये व्यस्त, म्हणून मुलांनी ‌‘एआय‌’ला बनवले मित्र!

अहवालातून धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : स्मार्टफोनने जग खऱ्या अर्थाने मुठीत आणले असले, तरी घरांमध्ये मात्र त्याने अंतर वाढवले आहे. ‌‘विवो‌’च्या ताज्या ‌‘स्विच ऑफ रिपोर्ट‌’मध्ये कुटुंबांमध्ये वाढत असलेल्या डिजिटल भिंतीबाबत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. अहवालातून असे दिसून आले आहे की, पालकांकडे वेळ नसल्यामुळे मुले आता भावनिक आधारासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा आधार घेत आहेत. या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 67 टक्के मुले आता त्यांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी एआय टूल्सची मदत घेतात. कारण, त्यांना वाटते की, त्यांचे पालक खूप व्यस्त आहेत.

परिस्थिती अशी आहे की, आता प्रत्येक 4 पैकी 1 मूल ‌‘एआय‌’मुळे त्यांच्या पालकांशी कमी बोलत आहे. हा आकडा दर्शवतो की, मुलांसाठी भावनिक वेळेची किती गरज आहे. अभ्यासात असे आढळून आले की, रात्रीचे जेवण हीच ती वेळ आहे जेव्हा 72 टक्के मुले त्यांच्या कुटुंबासोबत सर्वात जास्त वेळ घालवतात; पण येथेही मोबाईल फोन खलनायक ठरतो. 72 टक्के पालक आणि 30 टक्के मुले मान्य करतात की, डायनिंग टेबलवर फोन तपासणे हे संभाषणाचे सर्वात मोठे शत्रू आहे. जेव्हा पालक कामाच्या नावाखाली वारंवार फोन पाहतात, तेव्हा किशोरवयीन मुलांना दुर्लक्षित वाटू लागते आणि ते बोलणे थांबवतात. समाधानाची बाब म्हणजे, मुले आणि पालक दोघांनाही बदल हवा आहे.

91 टक्के मुलांनी मान्य केले की, जेव्हा आजूबाजूला फोन नसतो, तेव्हा ते त्यांच्या मनातल्या गोष्टी अधिक सहजपणे व्यक्त करू शकतात. सर्वेक्षणानुसार, ज्या कुटुंबांनी ‌‘नो-फोन डिनर‌’ म्हणजे फोन न पाहता जेवण सुरू केले आहे, त्यांच्या नात्यांमध्ये भावनिक मजबुती परतली आहे. ‌‘विवो‌’चा हा अहवाल स्पष्ट संदेश देतो की, तंत्रज्ञानाचा वापर नाती जोडण्यासाठी व्हायला हवा, त्यांची जागा घेण्यासाठी नाही. जेवण करताना फोन दूर ठेवणे यासारख्या छोट्या सवयी कुटुंबांना पुन्हा जवळ आणू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT