kidney disease and brain health |किडनीच्या समस्यांचा मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम 
विश्वसंचार

kidney disease and brain health |किडनीच्या समस्यांचा मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एका संशोधनातून असे समोर आले आहे की, किडनीच्या म्हणजेच मूत्रपिंडांच्या समस्यांचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावरही होतो. ‘द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल एसोसिएशन नेटवर्क ओपन’ या अधिकृत वेबसाईटवरील एका संशोधनानुसार, क्रॉनिक किडनीचा आजार जसजसा वाढत जातो, तसतशी बौद्धिक क्षमताही कमकुवत होत जाते. या समस्येला सामोरे जात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. योग्यवेळी काळजी न घेतल्यास ही समस्या पुढे गंभीर स्वरूप घेऊ शकते.

क्रॉनिक किडनी हा मूत्रपिंडाचा एक गंभीर आजार आहे. या स्थितीत मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू मंदावते आणि ते कायमचे निकामी होण्याची शक्यता असते. याची मुख्य कारणे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूतखडा ही आहेत. लघवीमध्ये बदल दिसणे, शरीरावर सूज येणे, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, त्वचेला खाज येणे आणि कोरडेपणा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होऊन धाप लागणे ही काही सुरुवातीची लक्षणे या आजारात दिसून येतात. तसेच मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा विषारी घटकांमुळे कामात लक्ष न लागणे, विसरभोळेपण किंवा चक्कर येणे अशा समस्या जाणवतात.

क्रॉनिक किडनीच्या आजाराचा मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याबाबत संशोधन करण्यासाठी टुलेन विद्यापीठ आणि अमेरिकेतील इतर संस्थांमधील संशोधकांनी एक तपासणी केली. ज्यामध्ये त्यांनी 21 ते 79 वयोगटातील 5.600 पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश केला होता. सर्वप्रथम संशोधकांनी या व्यक्तींच्या रक्ताचे आणि मूत्राच्या नमुन्यांची चाचणी केली आणि 6 वर्षांपर्यंत त्यांच्या बौद्धिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले. या संशोधनातून असे दिसून आले की, क्रॉनिक किडनी या आजारामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढू शकतो. याच वाढत्या रक्तदाबामुळे रुग्णांची बौद्धिक क्षमता कमकुवत होऊ शकते. शरीरातील किडनी आणि मेंदू हे दोन्ही वेगवेगळे अवयव असले, तरी ते रक्तवाहिन्यांनी जोडलेले असतात.

रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे किडनीचे रक्त शुद्ध करण्याचे कार्य मंदावते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण निर्माण होऊन त्या आकुंचन पावतात किंवा फुटतात, मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. उच्च रक्तदाबामुळे मेंदूच्या अगदी लहान रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते. यामुळे मेंदूच्या आत लहान-लहान सायलेंट स्ट्रोक येत असतात. यामुळे मेंदूचा जो भाग स्मरणशक्ती, तर्कशास्त्र आणि निर्णयक्षमतेसाठी जबाबदार असतो, तो भाग हळूहळू कमकुवत होऊ लागतो आणि मेंदूच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT